सोलापूर : सोलापूर महापालिकेत नव्याने बदलून आलेल्या आरोग्याधिकारी डॉ. राखी सुहास माने (वय ४८) यांची नेमणूक बेकायदा असल्याचा आक्षेप घेत त्या विषयावर वारंवार बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्या आणि दोन कोटी रुपयांची खंडणीही मागितल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यासह इतर दोन पत्रकारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पालिका आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसर आमदार बच्चू कडूप्रणीत प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्याशिवाय सैफन शेख आणि रणजित वाघमारे या दोन पत्रकारांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत. डॉ. राखी माने यांची बदली सोलापूर महापालिकेत आरोग्याधिकारी म्हणून नेमणूक झाली असून त्यांनी पदभारही हाती घेतला आहे. परंतु त्या आरोग्याधिकारीपदासाठी पात्र नाहीत. त्या कान-नाक-घसा तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांची नेमणूक आरोग्याधिकारीपदावर होणे बेकायदेशीर असल्याचा आक्षेप प्रहार संघटनेने नोंदविलेला होता. या मुद्यावर शासनाकडे तक्रारी करून पाठपुरावा केला जात होता.

हेही वाचा – Maharashtra MLC Election Result : विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी; पाच अधिकची मते कोणाची?

हेही वाचा – विधान परिषद निवडणूक निकाल : पंकजा मुंडेंसह भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय

या विषयावर डॉ. राखी माने यांच्या नेमणुकीच्या विरोधात सातत्याने बातम्या प्रसारित होत असताना वैतागलेल्या डॉ. माने यांनी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांची भेट घेतली असता त्यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यास नकार दिल्यामुळे सैफन शेख व रणजित वाघमारे यांनी डॉ. माने यांच्या विरोधात वारंवार बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्या. कुलकर्णी यांनी पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालकांची भेट घेऊन त्यांनाही डॉ. राखी माने यांना दोन कोटी रुपये देण्यास सांगा म्हणून म्हटले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.