सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू तस्करी करणारे टाटा इन्ट्रा मालवाहतूक वाहन पोलिसांना पाहताच वेगाने दामटत पळून जाताना पालथे झाले. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण शिवारात दुपारी घडलेली दुर्घटना सहा दिवसांनी उजेडात आली आहे. यात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, याप्रकरणी मृतासह वाहनचालक व वाहनमालक आणि अन्य दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

देवल शक्तिमान उघडे (रा. शिरगाव, ता. पंढरपूर) असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये वाहनचालक सूरज शहाजी चव्हाण (रा. सांगोला) याच्यासह वाहनात वाळू भरून पाठीमागे बसलेले गणेश भाऊसाहेब मस्के व गणेश दत्तात्रय मस्के (रा. शिरगाव) यांचा समावेश आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले गेले. या मृत देवल उघडे हासुद्धा वाहनात वाळू भरून पाठीमागे बसला होता. या चौघांसह वाहनमालक चैतन्य सुभाष गायकवाड (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) यास आरोपी करण्यात आले आहे.

हेही वाचा – गडचिरोली: पेरमिलीत पोलिसांवर गोळ्या झाडणाऱ्या रिनाने अखेर बंदूक ठेवली…नक्षल चळवळीला मोठा धक्का…..

याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक ईश्वर धुमाळ हे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत दुपारी चारच्या सुमारास उचेठाण परिसरात आले होते. तेव्हा मुडवी येथून माण नदीतून अवैध वाळू भरून येणारे टाटा ईन्ट्रा मालवाहतूक करणारे चारचाकी वाहन दिसून आले. त्यास थांबण्याचा इशारा केला असता कारवाई टाळण्यासाठी, जागेवर न थांबता तशाच भरधाव वेगाने वाहन जात होते. त्यामुळे पोलीस नाउक धुमाळ यांनी पाठलाग केला असता पुढे काही अंतरावर वाहन पालथे झाले. यात एकाचा मृत्यू तर अन्य तिघे जखमी झाले.

हेही वाचा – चंद्रपूर : स्वयंपाक झाला, ताटं वाढली, जेवायला बसणार इतक्यात थेट बिबट्याच माजघरात….

ही दुर्घटना गेल्या २२ जुलै रोजी घडली होती. परंतु त्याची माहिती पोलिसांकडून उजेडात आली नव्हती. अखेर शनिवारी दुपारी त्याची माहिती बाहेर पडली. मंगळवेढा भागात भुमा व माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू तस्करी होत असताना रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाच्या किंवा अन्य कारणाने थांबलेल्या पोलिसांकडून ‘अर्थ’ पूर्ण व्यवहार केले जातात. यातून कारवाईच्या भीतीने वा पोलिसांचा पाठलाग सुरू असताना वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यातूनचा जीवघेणा अपघात होतो. आंधळगाव येथेही अलिकडे असाच जीवघेणा प्रकार घडला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अशा घटनांची सखौल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.