सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांचे अर्ज भरताना एका अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मोहोळ तालुक्यातील वाळूज देगाव येथे हा प्रकार घडला.
सुरेखा रमेश आतकरे (वय ४८, रा. वाळूज देगाव) असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ मिळण्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ नावाच्या ॲपवरून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना सतत तांत्रिक अडचणी उद्भवतात. अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे ऑनलाईन अर्ज भरत होत्या. वसुधा जयराम लाकुळे नावाच्या लाभार्थी महिलेचा ऑनलाईन अर्ज भरत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने सुरेखा आतकरे खुर्चीतच कोसळल्या आणि निपचित पडल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे आतकरे यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.
फक्त एक लाखाची मदत
अंगणवाडी सेविका एकीकडे अत्यल्प मानधनावर काम करतात. मुलांना शिक्षणाचे धडे गिरविणे व पोषण आहार देण्यापासून ते इतर काही योजनांची कामेही करतात. वरचेवर योजनाबाह्य कामांची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात येत आहे. त्यापैकीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची जास्तीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर लादण्यात आली आहे. कामाचा ताण वाढल्यामुळेच अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका संघटनेचे सचिव सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्या वारसदारांना शासनाकडून जेमतेम एक लाख रुपयांची मदत मिळू शकते. ही मदत खूप अत्यल्प असून जखमेवर मीठ चोळणारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.