सोलापूर : एका मजूर सहकारी संस्थेच्या विरोधात प्राप्त तक्रारीची चौकशी करून कारवाई न होण्यासाठी संस्थेच्या बाजूने सकारात्मक अहवाल सादर करण्यासाठी संस्थाचालकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना सोलापुरात सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील उपलेखापाल शिवाजी गंगाधर उंबरजे (वय ५७) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्थेच्या कारभाराच्या विरोधात आनंद चव्हाण नामक व्यक्तीने दक्षिण सोलापूरच्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने उपलेखापाल शिवाजी उंबरजे यांनी संस्थाचालकाला बोलावून घेतले. प्राप्त तक्रारीनुसार चौकशीनुसार पुढील होणारी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संस्थेच्या बाजूने सकारात्मक अहवाल वरिष्ठांना सादर करण्यासाठी उपलेखापाल उंबरजे यांनी संस्थाचालकाकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये देण्याचे ठरले.
तथापि, संस्थाचालकाने याबाबत सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पडताळणी करून गुरुनानक चौकात ठरल्याप्रमाणे सापळा रचण्यात आला. यात उपलेखापाल उंबरजे याने दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताक्षणी पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सोलापूर कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.