सोलापूर : कांद्यासाठी पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याप्रमाणे अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीची प्रक्रिया येत्या २५ मार्चपासून सुरू होऊन २७ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

राज्यात नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकप्रमाणे सोलापूर कृषी उत्पन्न समितीचा लौकिक आहे. विशेषतः सोलापूरची बाजारपेठ कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत दीड वर्षापूर्वीच संपली होती. परंतु समितीच्या तत्कालीन सभापतिपदी राहिलेले भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आग्रहाखातर बाजार समितीच्या संचालक मंडळाला पहिल्यांदा दुष्काळामुळे सहा महिने तर दुसऱ्यांदा अतिवृष्टीचे कारण पुढे करीत आणखी सहा महिने असे मिळून वर्षभर मुदतवाढ मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी होऊन अखेर चार आठवड्यांच्या मुदतीत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला होता. तथापि, त्याचवेळी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय बाजारच्या अनुषंगाने राज्य सरकारची पावले पडत असल्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला खो बसण्याची चिन्हे दिसत होती. परंतु ती फोल ठरली असून ठरल्याप्रमाणे या बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. याबाबत राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक खाडे यांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार २५ मार्च ते २८ मार्चपर्यंत चार दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत आहे. मतदान २७ एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी, २८ एप्रिल रोजी झाल्यानंतर लगेचच निकाल जाहीर होणार आहे.

एकूण १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत ११ जागा सहकारी संस्था गटांसाठी आहेत. यात सर्वसाधारण-७, महिला राखीव-२, इतर मागासवर्गीय व विमुक्त जाती व भटक्या जमाती-प्रत्येकी १ यांचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत गटाच्या ४ जागांमध्ये सर्वसाधारण-२, अनुसूचित जाती व जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-प्रत्येकी १ याप्रमाणे उमेदवार निवडून द्यायचे आहेत. याशिवाय व्यापारी घटकातून २ तर हमाल व तोलार गटातून एक जागा निवडून द्यायची आहे.