सोलापूर : भाजपचे दोन आमदार देशमुख विरूद्ध याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिल्या जाणा-या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. येत्या २७ एप्रिल रोजी या निवडणुकीत मतदान प्रक्रिया राबविली जाणार असून, दुसऱ्याच दिवशी, २८ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे.
राज्यात नवी मुंबई, पुणे व नागपूरनंतर चौथ्या क्रमांकाची मानली गेलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्याच पक्षाचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांना बाजूला ठेवून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने व या पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आदींबरोबर एकत्र येऊन पेमेंट उभे केले आहे. या पॅनलमध्ये सहकारातील प्रस्थापित वजनदार नेत्यांचा समावेश आहे. मात्र दुसरीकडे आमदार कल्याणशेट्टी यांची भूमिका पसंत न पडल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे दोघे पक्षांतर्गत विरोधक एकत्र आले आहेत. त्यांनी आमदार कल्याणशेट्टी यांना धडा शिकवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना संधी देण्याचा दावा करीत पॅनल उभे केले आहे.
आमदार कल्याणशेट्टी व माजी आमदार दिलीप माने यांच्या पॅनेलमध्ये संधी न मिळालेल्या अनेक वजनदार मंडळींनी भाजपच्या दोन्ही आमदार देशमुखांना साथ देण्याची भूमिका घेतली आहे. उल्लेखनीय म्हणजे या निवडणुकीतील घडामोडींपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे प्रथमच दूर आहेत. तर अक्कलकोट तालुक्यातील आमदार कल्याणशेट्टी यांचे विरोधक असलेले काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, बाजार समितीवर वर्षानुवर्षे सभापती राहिलेले दिवंगत नेते, माजी आमदार बाबुराव चाकोते यांचे पुत्र, माजी सभापती महादेव चाकोते यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीची नेते मंडळी भाजपाच्या दोन्ही देशमुखांना साथ देत आहेत.
सहकार क्षेत्रात वजनदार असलेल्या माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे यांच्यामुळे त्यांच्या पॅनेलचे पारडे जड असल्यानचा दावा केला जात असताना दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनीही काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांची साथ घेऊन ताकद वाढविली आहे. ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांना ऊत आल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीसाठी एकूण पाच हजार ४३१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात विविध कार्यकारी सोसायटी गटात १८९५, ग्रामपंचायत गटात ११७६, व्यापारी गटात १२७६ आणि हमाल व तोलार गटात १०८४ मतदार आहेत.