सोलापूर : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन आणि गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दिवसभर लाखापेक्षा जास्त भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. याचवेळी सुमारे ६५ कोटी रुपये खर्च उभारण्यात येणाऱ्या पाच मजली वातानुकूलित महाप्रसादगृहाचे भूमिपूजनही करण्यात आले. सायंकाळी नगर प्रदक्षिणेसह भव्य कार्यक्रम पार पडले.
सकाळी श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप, श्री गुरूपूजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण वातानुकूलित पाच मजली महाप्रसादगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे मुख्य पुरोहित मंदार पुजारी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम राम म्हेत्रे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, ज्येष्ठ वकील नितीन हबीब, पुण्याच्या अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष जनार्दन थोरात, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अनिल पाटील (ठाणे) कैलास वाडकर (शिरवळ, पुणे) आदींच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. नव्या महाप्रसादगृहाचे बांधकाम एक लाख १९ हजार २९८ चौरस फूट क्षेत्रात होणार आहे. येत्या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण होणार आहे. मंडळाचे सचिव शाम मोरे यांनी आभार मानले.
हेही वाचा – राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत – खासदार सुप्रिया सुळे
हेही वाचा – मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती
अन्नछत्र मंडळात गेले दहा दिवस धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक सोहळ्यासह रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो भाविकांनी रक्तदान केले. गुरूपौर्णिमेनिमित्त परगावाहून आलेल्या हजारो वाहनांना थांबण्याची सोय करण्यात आली होती. महाराष्ट्र, कर्नाटकासह तेलंगणा, गुजरात, गोवा आदी प्रांतांतून भाविक आले होते.