सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात उजनी जलाशयात अचानकपणे आलेले वादळी वारे आणि वावटळीमुळे हेलकावे खाऊन बोट बुडाली. यात एका दाम्पत्यासह सहाजण बेपत्ता झाले. दरम्यान, शोधकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकडीला पाचारण करण्यात आले असून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा रात्रभर शोध घेऊनही त्यापैकी एकाचाही शोध लागला नव्हता. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

उजनी जलाशय क्षेत्रातील कुगाव (ता. करमाळा) येथून अवघ्या काही अंतरावरील कळाशी आणि आजोती (ता. इंदापूर) येथे मंगळवारी सायांकाळी निघालेल्या बोटीत सातजण बसले होते. परंतु पुढे थोड्याच वेळांत अचानकपणे वादळी वाऱ्यासह वावटळ आली. यात बोट हेलकावे खाऊन जलाशयात बुडाली. यात गोकुळ दत्तात्रेय जाधव (वय ३०) आणि त्यांच्या पत्नी कोमल (वय २५) यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष) आणि माही गोकुळ जाधव (वय ३, सर्व रा. झरे, ता. करमाळा) तसेच अनुराग अवघडे (वय ३५) आणि गौरव धनंजय हजारे (वय १६, रा. कुगाव) हे सहाजण बेपत्ता झाले. याच बोटीतून प्रवास करणारे सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील फौजदार राहुल डोंगरे हे सुदैवाने न डगमगता पोहत कळाशी येथे जलाशयाच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्यांनी दुर्घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावकरी बोट बुडालेल्या ठिकाणी धावून आले. पट्टीच्या पोहणारे तरुण आणि मच्छिमारांनी शोधकार्य सुरू केले.

हेही वाचा – “शरद पवारांना आता १० वर्षांनी जाग आली का?” ‘त्या’ टीकेला अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर!

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आदींनी धाव घेऊन शोध कार्याला वेग दिला. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनीही रात्री दुर्घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. नौदलाच्या तुकडीला पाचारण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधण्यात आला. त्यानुसार रात्री उशिरा एनडीआरएफची तुकडी दाखल झाली. रात्रभर शोधकार्य करूनही दुर्दैवाने बेपत्ता व्यक्तींपोकी एकाचाही शोध लागला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, बुधवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू झाले. सकाळी नऊपर्यंत एकाही बेपत्ता व्यक्तीचा शोध लागला नव्हता.

हेही वाचा – शिराळ्यात अनोळखी व्यक्तीचा खून

या दुर्घटनेमुळे उजनी जलाशयातील जलवाहतुकीच्या नियमांचा उडालेला बोजवारा आणि प्रशासनाचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. जलवाहतूक करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हवा भरलेली रबरी ट्यूब, विशिष्ट पद्धतीचे जॅकेट यासारखी आवश्यक असलेली साधने उपलब्ध नसतात.

शोधकार्यात अडचणी

दरम्यान, उजनी जलाशयात बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत पाण्यात बुडालेल्या सहाजणांचा शोध घेण्यासाठी आलेली एनडीआरएफची २० जवानांची तुकडी सक्रिय होताना काही अडचणी समोर आल्या आहेत. जलाशयात पाण्याची खोली सुमारे ५० फूट आहे. काही ठिकाणी खोली जास्त तर काही ठिकाणी कमी आहे. जलाशयात मोठ्या प्रमाणावर वाळूमिश्रीत गाळ साचला आहे. बेपत्ता व्यक्ती गाळामध्ये अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उजनी जलाशयातील दुर्घटनाग्रस्त भागात धाव घेऊन दुर्दैवी बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला.

Story img Loader