सोलापूर : नेहमीप्रमाणे सकाळी व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेली दोन्ही लहानगी भावंडे एका शेततळ्यात तोल जाऊन कोसळली. यात एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ सुदैवाने बचावला. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे ही दुर्घटना घडली.
वेदांत सतीश व्हटकर (वय ९, रा. कुर्डूवाडी रोड, टेंभुर्णी) असे मृत मुलाचे नाव आहे. मात्र सुदैवाने त्याचा भाऊ आर्यन यास पाण्यात बुडताना वाचविण्यात यश आले. मृत वेदांत हा आपला भाऊ आर्यन यांच्यासह अन्य एक मुलगा असे तिघेजण सकाळी व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी एकत्र घराबाहेर पडले. वाटेत अनिता कुंटे यांच्या शेततळ्याजवळून जात असताना अचानकपणे तोल गेल्याने वेदांत तळ्यात कोसळला आणि पाण्यात बुडू लागला. तेव्हा त्याला वाचविण्यासाठी भाऊ आर्यन यानेही तळ्यात उडी मारली. परंतु दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. तेव्हा तिसऱ्या मुलाने आरडाओरडा केला असता एका परप्रांतीय शेतमजुराने तत्काळ धाव घेऊन आर्यन यास पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे तो बचावला. वेदांतचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी बचावकार्य केले असता शेवटी त्याचा मृतदेह सापडला.