सोलापूर : मोहरम उत्सवाची सोलापूरची स्वतंत्र्य वैशिष्ट्य परंपरा लाभली आहे. अठरापगड जाती-जमातींच्या सहभागातून मोहरम उत्सव साजरा करताना सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा दिसून येतो. त्याची अनुभूती मोहरम आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याचे औचित्य साधत पीर बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीला चौपाड विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाचा प्रिय असलेला तुळशीहार तेवढ्याच सश्रध्द भावनेने अर्पण करण्यात आला. ही कृती कोणताही डांगोरा न पिटता अगदी सहजगत्या झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थोरला मंगळवेढा तालीम येथील प्रसिध्द बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीची अडीचशे वर्षांची परंपरा आहे. मूळ मंगळवेढ्यातून सोलापुरात कसबा पेठेत राजपूत समाजातील दीक्षित कुटुंबीयांच्या ताब्यात आलेल्या या सवारीची पूजा अर्चा मुजावर कुटुंबामार्फत वंश परंपरेने केली जाते. या सवारीच्या प्रथम दर्शनाचा मान विमुक्त भटक्या वडार व अन्य उपेक्षित समाजाला दिला जातो. राजपूत, मराठा, धनगर, मुस्लीम, गवळी, लोणारी, गवंडी, सुतार, पिंजारी, मोची, बुरूड, माळी, सोनार, तेली, कोष्टी, कासार आदी समाजाच्या भाविकांची मोठी श्रध्दा आहे.

हेही वाचा…कराड : कोयनेला सौम्य भूकंप

बुधवारी सकाळी मोहरमच्या शहादत दिनी बडा मंगलबेडा सवारीची मिरवणूक हलगी, ताशा, संगीत बॕन्डसह वाजत-गाजत निघाली. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, अमर धंगेकर, संकेत पिसे, अनिकेत पिसे, बिज्जू प्रधाने, सतीश प्रधाने, सुनील शेळके, पृथ्वीराज दीक्षित, उज्ज्वल दीक्षित, धनराज दीक्षित दीक्षित, रवींद्र दुबे, राजू हूंडेकरी आदींच्या उपस्थितीत निघालेला हा मिरवणूक सोहळा चौपाड मंदिराजवळ पोहोचला, तेव्हा आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांनी सवारीचेही दर्शन घेतले.

हेही वाचा…शरद पवार म्हणाले, “ही दोन वर्तमानपत्रं आवर्जून वाचतो, आजकाल अग्रलेखांची…”

विठ्ठलाला प्रिय मानला जाणारा तुळशीहारही मंदिरातून आणून सवारीला अर्पण केला गेला. कोणताही गाजावाजा न करता ही कृती तेवढ्याच सहजपणे झाल्याचे दिसून आले. वाटेत महिला भाविकांनी जलकुंभाद्वारे सवारीचे पदप्रक्षालन केले. आसार शरीफ येथे भेटीचा विधी झाल्यानंतर सवारी पुन्हा वाजतगाजत थोरला मंगळवेढा तालीम भागात पोहोचली. कवी बदिउज्जमा बिराजदार यांनी फातेहाखानी अदा केली. त्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, सागर पिसे आदींना सन्मानित करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur celebrates muharram with unique tradition of social harmony and cultural unity psg