सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली. पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यास पक्षाच्या शहर जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी पदांचे राजीनामे देतील, असा इशारावजा दबाव पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांनी आणला आहे. दरम्यान, पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडू नये म्हणून सात रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण पुतळ्याजवळ आंदोलन केले.
हेही वाचा >>> “बदल हा सृष्टीचा नियम असतो पण…” सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र
पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रदेश संघटक सचिव शंकर पाटील आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पवार यांच्या नेतृत्वावर एकमुखाने निष्ठा व्यक्त करीत त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडू नये, अशा मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सध्याच्या अडचणीच्या काळात शरद पवार यांचे अध्यक्षपद कायम राहणे ही काळाची गरज आहे. जर पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली तर सोलापुरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी पदांचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशारावजा दबाव ठरावाच्या माध्यमातून आणला गेला. या बैठकीत माजी महापौर जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, लता फुटाणे, सुनीता रोटे, तौफिक शेख, महेश गादेकर आदी उपस्थित होते.