सोलापूर : एका बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या असह्य छळाला कंटाळून दुसऱ्या बांधकाम व्यायसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात येळेगाव येथे घडली. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा – राज्यपाल रमेश बैस पुढील आठवड्यात उन्हाळी महाबळेश्वर पर्यटनावर
दत्तात्रेय लक्ष्मण खोटे (वय ४४) असे चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी अर्चना खोटे हिने याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बाळासाहेब शेंडगे (वय ४५, रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) याचे नाव आरोपी म्हणून समोर आले आहे. १६ जानेवारी २०१९ पासून २१ एप्रिल २०२४ पर्यंत पाच वर्षे हा छळवणुकीचा प्रकार सुरू होता. मृत दत्तात्रेय खोटे हे बांधकाम व्यावसायिक होते. एका बांधकामासाठी त्यांनी आपल्या ओळखीचा बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब शेंडगे याच्याकडून सेंट्रिंगच्या कामासाठी भाडेतत्वावर लोखंडी प्लेटा घेतल्या होत्या. परंतु पुढे काही दिवसांतच खोटे हे व्यवसायातील अडचणीमुळे आर्थिक संकटात सापडले. त्यांनी भाड्याने घेतलेल्या लोखंडी प्लेटा भाड्यासह परत घेण्यासाठी बाळासाहेब शेंडगे याने तगादा लावून त्रास देणे सुरू केले. भाड्यापोटी दहा लाख रूपये न दिल्यास हातपाय तोडण्याच्या धमक्या देऊन जगणेच मुश्किलीचे केल्यामुळे दत्तात्रेय खोटे हे पुण्यात निघून गेले. इकडे बाळासाहेब शेंडगे हा गावात खोटे यांच्या आजारी, वृद्ध आई-वडिलांनाही धमकावत होता. त्यामुळे वैतागून खोटे यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.