Solapur District Collector Kumar Ashirwad : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोळ करून ही निवडणूक जिंकली असल्याचा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान, सोलापूरमधील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी या गावातील लोकांनी निवडणुकीत झालेलं मतदान व मतमोजणीनंतर समोर आलेली आकडेवारी तपासण्यासाठी गावात फेरमतदान करण्याची योजना गावकऱ्यांनी आखली होती. मात्र, प्रशासनाने फेरमतदान करण्यापासून गावकऱ्यांना रोखलं. गावात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. परिणामी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी (८ डिसेंबर) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांवर उत्तर दिलं.
कुमार आशीर्वाद म्हणाले, “उमेदवारांना फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. परंतु, फेरमतदान प्रक्रिया राबवण्याचा अधिकार नाही. तो अधिकार केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच आहे. लोकांच्या मनात पोस्टल बॅलेटबद्दल संभ्रम असू शकतो. त्यासाठी त्याने अर्ज करावा. प्रत्येक उमेदवाराला वाटतं की तोच जिंकणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारासाठी फेरमतमोजणी केली जात नाही. विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये २०० ते ३०० मतांचा फरक असेल तर आम्हीच फेरमतमोजणी करतो. अशा वेळी उमेदवारही फेरमतमोजणीची अपेक्षा करू शकतात. अमुक बूथवरील मशीन आणा आणि तपासा असं म्हणता येत नाही”.
हे ही वाचा >> वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीवर कुमार आशीर्वाद काय म्हणाले?
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, “ज्या दिवशी मतमोजणी झाली तेव्हा मतदान केंद्रावर तुमचे प्रतिनिधी (काऊंटिंग एजंट) नव्हते का? त्यांनी त्या वेळी मतमोजणीवर आक्षेप घेतला का? त्यावेळी आक्षेप घेतला नाही मग आता का घेताय? आता म्हणतायत की पूर्ण मतमोजणी नव्याने करा. परंतु, फेरमतमोजणीची मागणी करण्यासाठी तुमच्याकडे सबळ पुरावे आहेत का? असतील तर ते सादर करा. विशेष म्हणजे माळशीरस मतदारसंघातील ज्या उमेदवाराने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे तो उमेदवार जिंकला आहे”.
…तर भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती : कुमार आशीर्वाद
ईव्हीएमवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी हा निकालच फसवा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावरून नागरिकांचा प्रशासन व्यवस्थेवरील विश्वास कमी होतोय असं वाटतं का? असा प्रश्न कुमार आशीर्वाद यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मला नाही वाटत की लोकांचा प्रशासन व्यवस्थेवरील विश्वास कमी होतोय. लोकांचा विश्वास कमी झाला असता तर भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती. लोकांचा विश्वास कमी झाला असता तर बांगलादेशमध्ये जे घडतंय तसंच इथे घडलं असतं. तिथल्या लोकांचा सरकारवर, प्रशासन व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही, तिथे झालेल्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच विश्वास नाही असं म्हणत तिथली जनता रस्त्यावर उतरली. बांगलादेशमध्ये विद्रोह झाला. तसा प्रकार आपल्याकडे झालेला नाही. कारण जनतेचा प्रशासकीय यंत्रणेवर विश्वास आहे”.