सोलापूर : सोलापुरातील ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांना असह्य त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश माने-मुसळे हिला आणखी दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे. तिच्या कृत्यात आणखी कोणाची साथ होती ? रुग्णालयातील अन्य २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी तिला वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे.

गेल्या १८ एप्रिल रोजी डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर (वय ७०) यांनी रेल्वे लाईन-मोदी खाना परिसरातील निवासस्थानी स्वतःच्या मस्तकात रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत त्यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा माने-मुसळे हिने दिलेल्या त्रासामुळे व्यथित होऊन जीवन संपवत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार त्यांचे पुत्र डॉ. अश्विन वळसंगकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात मनीषा माने-मुसळे (वय ४५, रा. बसवराज नीलयनगर, जुळे सोलापूर) हिला पोलिसांनी अटक केली होती. तिला पुढील तपासासाठी तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. बुधवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी संशयित माने-मुसळे हिला पुन्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.

तीन दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान आरोपी महिलेकडे विविध मुद्द्यांवर तपास करण्यात आला. परंतु तिने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. मृत डॉ. वळसंगकर यांच्यावर खोटे आणि घाणेरडे आरोप केले असून त्यामागे तिचा कोणता हेतू होता? यात तिला कोणी मदत केली, त्याबाबत सत्यता पडताळण्यासाठी तसेच आरोपी महिला प्रशासकीय अधिकारी हिने स्वतःच्या मर्जीने साहित्य खरेदीचे अधिकार घेऊन त्याचे पैसे घेत असे. ही बाब डॉ. वळसंगकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिचे हे अधिकार काढून घेतले होते. त्यामुळे ती डॉ. वळसंगकर यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चिडून होती. यासह रुग्णालयातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपींविरुद्ध केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पोलीस तपास अधिकाऱ्यांनी वाढीव पोलीस कोठडी मागितली. त्यावर सुनावणी होऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली. यावेळी सरकारतर्फे ॲड. शिल्पा बनसोडे-सुरवसे तर आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले. पोलीस तपास अधिकारी अजित लकडे यांनीही म्हणणे मांडले.