सोलापूर : भारतीय स्टेट बँकेत लिपीकपदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील एका तरुणाला आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी जालना येथील एका दाम्पत्यासह तिघाजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यंकटेश नागनाथ चौगुले (वय ३४, रा. अशोक चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने जेलरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार निर्मला रणधीर परदेशी व तिचा पती रणधीर तुळशीराम परदेशी आणि अब्दुल माजीद खान (तिघे रा. जालना) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. २०२० पासून चार वर्षांत चौगुले यास नोकरीच्या आमिषाने लुबाडले जात होते.
व्यंकटेश चौगुले हा उच्च शिक्षणानंतर २०२० साली नोकरीच्या शोधात पुण्यात गेला होता. तेथे भारतीय स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड शाखेत त्यास नोकरी मिळाली होती. तेथेच निर्मला परदेशी ही देखील नोकरीस असल्याने त्यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते. दरम्यान, निर्मला परदेशी हिने नोकरी सोडल्यानंतर काही दिवसांनी व्यंकटेश यास संपर्क साधून आपणास स्टेट बँक आफ इंडियामध्ये लिपीकपदावर नोकरी लागल्याचे सांगितले. ही नोकरी आपल्या पतीचे ओळखीचे अब्दुल माजीद खान यांच्या मार्फत लागल्याचे सांगितले. खान हेसुद्धा याच बँकेत सेवेत असून बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेत समितीवर ते कार्यरत असून त्यांच्या मार्फत नोकरीसाठी अनामत पाच लाख रुपये द्यावे लागतात, असे सांगून निर्मला परदेशी हिने भुरळ पाडली.
हेही वाचा – “अडीच वर्ष सरकारला बहिणी आठवल्या नाहीत का?”, लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला
हेही वाचा – सोलापूर : दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना ४ वर्षे सक्तमजुरी, ५० हजारांचा दंड
व्यंकटेश याने आई-वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेची जुळवाजुळव करून देण्याची तयारी केली असता निर्मला परदेशी हिने आणखी दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे कळविले. तथापि, यात फसवणूक होण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे सावध झालेल्या व्यंकटेशने दिलेली आठ लाखांची रक्कम परत मागितली. ही रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे अखेर त्याने पोलिसांत धाव घेतली.