सोलापूर : उन्हाळ्यात उष्णता शमविण्यासाठी आपल्या बैलांना अंघोळ घालण्यासाठी तळ्यात गेलेल्या एका शेतकऱ्याला पाण्यात बुडून स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यांच्या बैलजोडीपैकी एका बैलाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे ही दुर्घटना घडली.

अंकुश काशीनाथ शिरसाट (वय ५५) असे दुर्दैवी मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना अंकुश शिरसाट यांनी आपल्या बैलजोडीला अंघोळ घालण्यासाठी गावानजीक सिद्धनाथ साखर कारखान्याच्या पाठीमागील तळ्यात नेले. बैलगाडी तळ्यात नेल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बैलगाडी तळ्यात मध्यभागी गेली आणि खोल पाण्यात उलटली. तेव्हा बैलांना वाचविण्यासाठी अंकुश शिरसाट यांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु ते स्वतः पाण्यात बुडाले. यात त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. बैलजोडीपैकी एका बैलाचाही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.कालव्यात पोहताना मुलाचा मृत्यू

मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द गावात लमान तांड्यावर दुपारी रखरखत्या उन्हात पोहण्यासाठी कालव्यात गेलेल्या एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अन्य एका मुलाला वाचवण्यास यश आले. विराज विनोद राठोड (वय ८) असे दुर्दैवी मृत मुलाचे नाव आहे. तो प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होता. उन्हाळ्याच्या सुटीत तो इतर मुलांसह पोहण्याचेही प्रशिक्षण घेत होता. इतर मुलांसोबत विराज हा कालव्यात पोहण्यासाठी गेला असता त्याला थोड्याच वेळात दम लागला. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्यांच्यासमवेत अन्य एक मुलगाही पाण्यात बुडू लागला. तेव्हा सर्व मुलांनी आरडाओरडा केला असता तरुणांनी पाण्यात उतरून एका मुलाला वाचवण्यात यश मिळविले. मात्र विराज राठोड हा मरण पावला. कामती पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.