सोलापूर : गुळाचे उत्पादन साधारणपणे उसाच्या रसापासून घेण्याची पारंपरिक पद्धत आहे. परंतु त्याऐवजी चक्क नीरेपासून चविष्ट गूळ सोलापूर जिल्ह्यातील माळीनगरात तयार होत आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असून या गुळाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये नीरेपासून गुळाची निर्मिती होत होती. महाराष्ट्रात काही शहरांमध्ये हा गूळ विक्रीसाठी परप्रांतीय विक्रेते आणतात. त्याचा अभ्यास करून माळीनगरच्या पृथ्वीराज निळकंठ भोंगळे या तरुण, प्रयोगशील शेतकऱ्याने नीरेपासून गूळ उत्पादनाचा ध्यास घेतला. यासाठीचा अभ्यास करत त्यानुसार शिंदीची लागवड करत हा व्यावसायिक प्रयोग यशस्वी केला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी आदींनी भोंगळे यांचे कौतुक केले आहे.

माळीनगरात निळकंठ भोंगळे यांचे सहा एकर क्षेत्रात शिंदीच्या झाडांचे बन आहे. खजूर कुटुंबापैकी (डेट फार्म फॅमिली) असलेल्या या शिंदीच्या झाडापासून तयार होणारी आरोग्यवर्धक नीरा विकण्याचा व्यवसाय भोंगळे कुटुंबीय करतात. ‘कल्पतरू नीरा पाम’ म्हणून या शेतीपूरक उद्योगाला नाममुद्रा मिळाली आहे. नीरा उत्पादनानंतर पुढचे पाऊल म्हणून निळकंठ भोंगळे यांचे पुत्र पृथ्वीराज यांनी सूक्ष्म अभ्यास आणि निरीक्षणाअंती आरोग्यदायी नीरेपासून काकवी आणि गूळ तयार करण्याचा नवा प्रयोग हाती घेतला आहे. पहाटे झाडावरून विशिष्ट पद्धतीने नीरा खाली उतरवून घेण्यापासून ते गूळ तयार करण्यापर्यंत सर्व कामे पश्चिम बंगालमधील कुशल मजूर करतात. उतरविलेली नीरा शुद्ध करून घेतल्यानंतर पेटविलेल्या भट्टीवर अष्टकोनी कढईत उकळी फुटेपर्यंत तापविली जाते. उकळणारा निरेचा रस ढवळल्यानंतर त्याला घट्टपणा येऊन चॉकलेटी रंग येतो. हा पाक एका लाकडी साच्यात ओतून चौकोनी आकाराच्या प्रत्येकी ५० ग्रॅम वजनाची गुळाची वडी तयार केली जाते.

झाडांची देखभाल, मजुरी, गूळनिर्मिती, पॅकिंग, ब्रॅण्डिंग आदी यंत्रणांवर होणारा खर्च वजा जाता नीरेपासूनच्या गुळापासून किफायतशीर उत्पन्न मिळते. या गुळाला मुंबई, दिल्ली, बंगळुरू आदी ठिकाणच्या बाजारपेठा उपलब्ध होत आहेत. या गुळाची विक्री ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या व्यापार कंपन्यांच्या माध्यमातून देखील होत असल्याचे पृथ्वीराज भोंगळे यांनी सांगितले.

नीरा ही आजवर फक्त एक पेय म्हणून वापरली जात होती. परंतु शिंदीच्या झाडांची लागवड करत त्यापासून गूळ तयार करण्याचा हा प्रयोग अभिनव स्वरूपाचा. दक्षिण भारतात चेन्नई व अन्य काही ठिकाणी असा गूळ बनवला जातो. महाराष्ट्रात मात्र माळीनगरमध्ये सुरू केलेला हा पहिलाच शेतीपूरक उद्योग प्रकल्प आहे. – पृथ्वीराज भोंगळे

साखरेपाठी गुळाचा प्रारंभ!

नीरेपासून गूळनिर्मितीचा महाराष्ट्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग माळीनगर येथील पृथ्वीराज भोंगळे या तरुण, उद्योजक शेतकऱ्याने केला आहे. योगायोगाची बाब म्हणजे याच माळीनगरात महाराष्ट्रातील पहिला खासगी साखर कारखाना उभारण्यात आला होता. दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या रूपाने १९३२ मध्ये माळी समाजातील शेतकऱ्यांनी या साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली होती. आता त्याच स्थळावरून नीरेपासून गूळनिर्मितीचाही प्रारंभ होत आहे.