सोलापूर : एनटीपीसीसारखा मोठ्या औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून भरीव उत्पन्नाचे साधन हाती असलेल्या दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी ग्रामपंचायतीत झालेल्या अपहारप्रकरणी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्यांच्यावर चार कोटी ४२ हजार ९१ हजार ९९३ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
एनटीपीसी प्रकल्पामुळे फताटेवाडी ग्रामपंचायत श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये मोडली जाते. एनटीपीसी प्रकल्पाकडे मोठ्या प्रमाणावर असलेली मिळकतकर थकबाकी वसूल झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाचे राहणीमान बदलले होते. या ग्रामपंचायतीमध्ये मोठा अपहार झाल्याची तक्रार फताटेवाडी येथील रहिवासी विनोद रमेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे विभागीय महसूल आयुक्त आणि राज्याच्या लोकायुक्तांकडे केली होती. त्याचा पाठपुरावाही चालविला होता. त्यानुसार चौकशी झाली. त्यात अपहाराचा प्रकार उजेडात आला.
याप्रकरणी तालुका पंचायतीचे विस्ताराधिकारी सदाशिव कोळी यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फताटेवाडी ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अपहार झाला आहे. विशेषतः तांत्रिक मान्यता व मोजमाप नोंदवहीमध्ये मूल्यांकनापूर्वी निधी खर्च करणे, एकाच कामावर दोन वेळा निधी खर्च करणे, एकाच कामाचे दुबार मूल्यांकन नोंदविणे, रोखीने खर्च करणे, एकाच कामासाठी दोन यंत्रणा कार्यरत ठेवणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता नियम २०११ चे पालन न करणे, कर्मचारी वेतन व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे, १५ व्या वित्त आयोगांतर्गत लेखासंहितेचे पालन न करणे, व्यक्ती, संस्था वा ठेकेदारांच्या नावाने निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी न करता देयके अदा करणे, एकाच ठेकेदाराला त्याची गुणवत्ता, कामाचा अनुभव आणि आर्थिक भांडवल न पाहता त्यास अनेक कामांचा मक्ता देणे आदी आक्षेपार्ह प्रकार घडले आहेत.
याशिवाय रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणानंतर डांबरीकरण करणे, रस्ते आणि भूमिगत गटारांच्या कामांचे तुकडे पाडणे, मंजूर असलेली कामे ग्रामपंचायत हद्दीच्या बाहेर करणे, साहित्याची खरेदी करताना जीईएम पोर्टलचा वापर न करणे, चौकशी समितीस दप्तर उपलब्ध करून न देणे, सरकारी रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा न करणे असेही आक्षेपार्ह प्रकार सरपंच, सरपंच आणि ग्रामसेवकाने संगनमत करून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी सुरू झाल्यापासून गेले अनेक दिवस सरपंच गायब झाले आहेत. त्यांचा व इतरांचा पोलीस शोध घेत आहेत