सोलापूर : सोलापूरच्या बहुप्रतीक्षित नागरी विमानसेवेला मुहूर्त अखेर मिळाला असून येत्या २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूरच्या नागरी विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात विविध विकासकामांच्या शुभारंभासह भूमिपूजनांचा धूमधडाका सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ घाईगडबडीत उरकला जात आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी १५ जून २०१६ रोजी उडान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातच सोलापूर विमानसेवेला मंजुरी दिली होती. परंतु त्या अनुषंगाने सोलापूरच्या छोटेखानी विमानतळावर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने उडान योजना सोलापूरकरांसाठी कागदावर राहिली होती. त्यानंतर सुमारे सात वर्षे विमान सेवेबाबत फारशा हालचाली झाल्या नव्हत्या. अलीकडे दोन वर्षांत विमानसेवेची मागणी जोर धरू लागली. परंतु विमानसेवेसाठी विविध ३६ अडथळे असल्यामुळे हा प्रश्न रखडला होता.

हेही वाचा >>>Devendra Fadnavis : “शंभर राहुल गांधी आले तरीही…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, विमानतळालगत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची ९२ मीटर उंच चिमणी सोलापूर महापालिकेला बेकायदा ठरवून १५ जून २०२३ रोजी पाडून टाकली. अन्य काही अडथळेही दूर केले. त्यानंतर सध्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानसेवा सुरू होण्याच्या अनुषंगाने जातीने लक्ष घालून विमानतळावर विविध सुधारणा घडवून आणल्या. भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सोलापूर विमानतळावरून नागरी विमानसेवेसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली. नागरी विमान उड्डाण सुरक्षा ब्युरोनेही सोलापूरच्या विमानतळावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कामांची पूर्तता करून घेण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः लक्ष घालून सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता करून घेतली. पुढील ऑक्टोबरमध्ये नागरी विमानसेवा वाहतूक महासंचालनालयाकडून विमानसेवेला परवानगी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अचानकपणे दिल्लीतून वेगाने हालचाली सुरू झाल्या आणि अपेक्षेपेक्षा महिनाभर अगोदरच सोलापूर विमान सेवेला मुहूर्त लागला. २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असल्याचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ करण्याचे ठरले. त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय प्रक्रिया युद्ध पातळीवर राबविण्यात आली.

सुरुवातीला पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू होणार असून त्यानंतर लवकरच मुंबई-सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होईल. नंतर हैदराबाद आणि तिरुपतीसाठीही सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सोलापूर विमानतळाची धावपट्टी तुलनेने छोट्या आकाराची म्हणजे २००९ मीटर लांबीची आहे. त्यामुळे येथून ४० आणि ७२ आसन क्षमतेची नागरी प्रवासी विमानसेवा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सध्या फ्लाय ९१, स्टार एयर आदी तीन नागरी विमान वाहतूक कंपन्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी तयार आहेत.