सोलापूर : प्रयागराज येथे सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात गेलेले सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे (वय ६०) यांचा कडाक्याच्या थंडीत गंगास्नान करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते असलेले महेश कोठे हे महाकुंभमेळ्यासाठी आपल्या काही मित्रांसह प्रयागराजला गेले होते. तेथे सकाळी कडाक्याच्या थंडीत गंगा नदीमध्ये स्नान आटोपत असताना त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र आणि दोन कन्या, सून, जावई असा परिवार आहे. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे हे त्यांचे पुतणे आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे दिवंगत विश्वासू सहकारी विष्णुपंत कोठे यांचे महेश कोठे हे चिरंजीव होते. १९९२ सालापासून २०२२ साली महापालिका बरखास्त होईपर्यंत ते अखंडपणे सोलापूर महापालिकेत नगरसेवक होते. महापौर, पालिका सभागृहनेता अशा जबाबदाऱ्या सांभाळताना सुमारे २५ वर्षे महापालिकेचा संपूर्ण कारभार कोठे कुटुंबीयाच्या हाती होता. त्यांचा मुलगा प्रथमेश व पुतण्या देवेंद्र राजेश कोठे, भाचा विनायक कोंड्याल यांच्यासण नगरसेवक होते. परंतु अलीकडे सुशीलकुमार शिंदे यांच्याशी बिनसल्यानंतर कोठे कुटुंबीयांनी वेगळी राजकीय वाट धरली होती. महेश कोठे यांनी २०१४ साली सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून थेट सुशीलकुमारांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढत दिली होती. सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीतही भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात २००९ आणि २०२४ अशा दोन वेळा आव्हान उभे केले होते. अशा प्रकारे सतत चार वेळा विधानसभा लढूनही त्यांचे आमदारकीचे स्वप्न साकार झाले नाही. नुकत्याच विधानसभा निवडणुकीत महेश कोठे हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे उभे राहिले असता त्यांच्या पदरी अपयश आले असताना दुसरीकडे त्यांचे पुतणे देवेंद्र राजेश कोठे यांनी मात्र प्रणिती शिंदे यांनी सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या शेजारच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भाजपच्या माध्यमातून कोठे कुटुंबीयांत खेचून आणली होती. दुसरीकडे महेश कोठे हे पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षीय राजकारणात सक्रिय नव्हते.