सोलापूर : माळशिरस तालुक्यातील नातेपुतेजवळ कारुंजे गावच्या हद्दीत मोटार आणि टेम्पो यांच्या अपघातात दोघा मायलेकासह चौघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाले. रविवारी सकाळी घडलेल्या अपघाताची नोंद नातेपुते पोलीस ठाण्यात झाली आहे.

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील राजेश अनिल शहा (वय ५५) यांच्यासह त्यांच्या कारखान्यातील कामगार दुर्गेश शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२) आणि तिचा मुलगा शिवलाल विशाल काळे (वय १०) अशी या अपघातातील चौघा मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०) आणि अश्विनी दुर्गेश घोरपडे यांचा समावेश आहे.

हेही वाचा – सातारा : रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षांतराचे वृत्त फेटाळले

हेही वाचा – SambhajiRaje Chhatrapati : “केंद्रात अन् राज्यात तुमचं सरकार, मग स्मारक का झालं नाही?”, संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला सवाल

मृत राजेश शहा हे आपल्या कंपनीतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन सातारा जिल्ह्यातील कासपठाराच्या सहलीला निघाले होते. सकाळी त्यांनी इंदापूर सोडले होते. पुणे-पंढरपूर मार्गावरून कासपठारच्या दिशेने जात असताना, लासुर्णेपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर कारुंजे (ता. माळशिरस) गावच्या हद्दीत पुलावरून त्यांची मोटार चुकीच्या दिशेने धावत होती. तेव्हा या मोटारीची दुसऱ्या एका टेम्पोला धडक बसून हा अपघात झाला. या अपघाताची माहिती कळताच नातेपुते पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले. जखमीवर नजीकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.