सोलापूर : विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुढी पाडव्याचा उत्सव पूर्वापार परंपरेने साजरा करण्यात आला. हिंदू नववर्षाचेही तेवढ्याच हर्षोल्लासाने स्वागत करण्यात आले. त्यानिमित्ताने शहरात दोन वेगवेगळ्या भागातून शोभायात्रा काढण्यात आल्या.
होळी आणि रंगपंचमीनंतर सर्वांना गुढी पाडव्याचे वेध लागले होते. सकाळी घरोघरी संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात गुढी आणि तोरण उभारण्यात आले. त्याशिवाय भगवे ध्वज उभारण्यात आले. त्यानिमित्ताने सर्वत्र उत्साह आणि चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. घरोघरी पुरणपोळीचा बेत आखण्यात आला होता. यावेळी महिला भगिनींची लगबग दिसून आली. सर्वत्र रंगावलीचा सुंदर आविष्कार दिसून आला.
गुढी पाडव्यासाठी बाजारपेठा अक्षरशः फुलून गेल्या होत्या. साखरेचे हार सुरूवातीला प्रति किलो १२० रूपये ते १५० रूपयांपर्यंत मिळत होते. परंतु पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले. प्रति किलो १५० रूपये ते १८० रूपयांपर्यंत साखर हारांची विक्री झाली. फुलांचे भावही चांगलेच वधारले होते.
गुढी पाडव्याचे औचित्य साधून मध्यमवर्गीय मंडळींनी सोन्याचे दागिने खरेदीसाठी सराफ कट्टा भागात गर्दी केली होती. सोन्याचा भाव प्रति तोळा ९० हजार रूपयांच्या पुढे गेला तरीही आपल्या आर्थिक कुवतीनुसार सोने खरेदीचा मोह आवरता येत नव्हता. सदनिका, भूखंड, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, फर्निचर आदींची खरेदी उत्साहात झाली. यानिमित्ताने बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली.
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात दोन वेगवेगळ्या भागातून शोभायात्रा काढण्यात आल्या. बाळीवेस आणि जुळे सोलापूर भागातून निघालेल्या दोन्ही शोभायात्रांमध्ये उत्साह दिसून आला. वाजतगाजत निघालेल्या या शोभायात्रांमध्ये पारंपरिक मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणा-या महिला भगिनींचा सहभाग उल्लेखनीय होता.