सोलापूर : तापलेल्या सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच ४३.२ अंश सेल्सिअस इतका प्रचंड तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे सोलापूर हे ‘शोलापूर’ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.एका दिवसाचा अपवाद वगळता दोन दिवस तापमान ४३ अंशांच्या घरात होते. शुक्रवारी मात्र तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे सरकल्याने सोलापूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत.
सकाळपासूनच उन्हाची अधिक तीव्रता जाणवत होती. दुपारी प्रचंड उष्म्याने अंगाची लाही लाही होऊन नागरिक कासावीस झाले होते. दुपारनंतर अचानकपणे आकाशात ढगांची गर्दी होऊन अवकाळी पाऊस पडण्याची चाहूल लागली होती. परंतु, वारा न खेळता हवामान कोरडेच होते. यंदाच्या उन्हाळ्यात होळीच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारीपासून सोलापुरातील तापमान वाढत आहे. चालू एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा उत्तरोत्तर वाढत असल्यामुळे सूर्यनारायण कोपले की काय, अशी चिंता वाढविणारी स्थिती दिसून येते. या तापमानामुळे सोलापूरची वाटचाल ‘शोलापूर’च्या दिशेने होत असल्याचे म्हटले जात आहे.
आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. शुक्रवारी उच्चांकी तापमान असताना सुदैवाने गूड फ्रायडे सणाची सुट्टी असल्यामुळे शासकीय व निमशासकीय कार्यालये बंद होती.