सोलापूर : सांगोला तालुक्यातील महीम गावात तेराव्या शतकातील एका मंदिरास सुवर्ण नाणे दान केल्याचा उल्लेख असलेला शिलालेख सापडला आहे. सोलापुरातील इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना प्राचीन इतिहास विषयक सर्वेक्षण करताना हा शिलालेख आढळून आला आहे. आढळून आलेला शिलालेख स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने स्वच्छ करून त्याचे ठसे घेण्यात आले आणि तातडीने हे ठसे पुण्यातील इतिहास अभ्यासक अनिल दुधाने व अथर्व पिंगळे यांच्याकडे वाचन करण्यासाठी पाठविले. त्यानुसार हा शिलालेख तेराव्या शतकातील असल्याचे स्पष्ट झाले.
या शिलालेखावर शके ११९१ काल उल्लेख असून, यादव राजा महादेव यांची प्रशस्ती करण्यात आलेली आहे. पिल्ले यांच्या जंत्रीनुसार शिलालेख कोरल्याची तारीख ९ मे १२६९ अशी आहे. महादेव राजाच्या काळातील एका मंदिरास २० गद्यान (सुवर्ण नाणे) दिल्याची नोंद असलेला महत्त्वाचा उल्लेख या शिलालेखात आला आहे. दिलेले दान नमूद करणे या शिलालेखाचा मुख्य विषय आहे.
या शिलालेखाची भाषा संस्कृत असून, त्यावर मराठीमधील जुन्या शैलीची काही अक्षरे कोरलेली आहेत. शिलालेखावर एकूण २२ ओळी असून, अठराव्या ओळीनंतरचा शिलालेखाच्या शिळेचा भाग खंडित झाला होता. तो भागही शोधण्यात अणवेकर यांना यश मिळाले आहे. शिलालेखाची सुरुवात ‘स्वदत्ता परदत्तां वा यो हरते वसुंधरा ‘ अशी करण्यात आली आहे, हे प्रसिद्ध शाप वचन आहे.
सोलापूर जिल्ह्यावर मध्ययुगीन काळात कल्याणीचे चालुक्य मंगळवेढ्याचे कलचुरी, अक्कलकोटचे शिलाहार, द्वार समुद्रचे होयसळ, देवगिरीचे यादव अशा विविध घराण्यांची सत्ता होती. यापैकी यादव राजा महादेवाच्या काळातील सोलापूर जिल्ह्यातील हा पहिला शिलालेख असल्याचा दावा नितीन अणवेकर यांनी केला