लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : देशात केळी निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा वाटा ५७ टक्के असूनही शासनाच्या केळी उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांच्या सुचीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे नाव नाही, अशी खंत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली. केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या करमाळा तालुक्यातील कंदर येथे आयोजिलेल्या महाराष्ट्र केळी उत्पादक शेतकरी संघाच्या केळी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहिते-पाटील बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने-पाटील होते. या परिषदेत राज्याच्या विविध भागातून अनेक केळी उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. केळी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर तालुकाध्यक्ष वैभव पोळ यांनी स्वागत केले. राज्यात दर्जेदार केळी उत्पादन आणि निर्यातीमध्ये सोलापूरचा मोठा वाटा असताना केळी उत्पादन करणा-या शासनाच्या जिल्हा सुचीमध्ये सोलापूरचा समावेश झाल्यास स्थानिक केळी उत्पादनाला आणि निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा-मनसेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेच! पक्षांतर्गत निवडणुकीत झाला ठराव, ‘या’ वर्षांपर्यंत राहणार पदावर!
केळी उत्पादकांपुढे सध्या असलेल्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्नशील आहे. करमाळ्याजवळ शेलगाव केळी संशोधन केंद्राच्या उभारणीसह अन्य प्रश्नांवर या परिषदेत चर्चा झाली. शेतकऱ्यांना फायदेशीर असलेली किसान रेल पुन्हा सुरू करण्यासह केळी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर कृषी योजनेत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली. केळी उत्पादक संघाचे संस्थापक-अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केळी उत्पादकांसमोर असलेल्या समस्या मांडल्या. केळी पिकासाठी प्रतिक्विंटल २३४० रूपये हमीभाव मिळावा, शालेय पोषण आहारात आठवड्यातून दोन दिवस केळीचा समावेश करावा, केळी पिकाला नुकसान भरपाई हेक्टरी नव्वद हजार रुपये करावी आदि मागण्या चव्हाण यांनी मांडल्या.
आणखी वाचा-नणंद लोकसभेत तर भावजय राज्यसभेत! सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड
या परिषदेत राज्यात विक्रमी उत्पादन घेणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वसंतराव येवले-पाटील ( माढा), राजेंद्र पाटील (भडगाव) भूषण पाटील (जळगाव) अशोक पाटील (पिंपळगाव, ता. पाचोरा) गणेश खोचरे (कन्हेरगाव, ता. माढा), रणजित पवार (कळंब, जि. धाराशिव), भिला पाटील (भडगाव, जि. जळगाव), सचिन राखुंडे (बाभूळगाव, ता. इंदापूर ), अविनाश सरडे (चिखलठाण, ता. करमाळा), पांडुरंग खबाले (वाशी), रमेश पाटील (कोळगाव), शिवदास पाटील (जामनेर), अभिजित भांगे (कंदर), विशाल शिरवत (पैठण), विजय पाटील (जामनेर), सुमित पाटील (पारोळा), दिनकर जायले (अकोट), विनोद बोरसे ( जळगाव), प्रकाश नेहते (रावल), योगेश पवार (चाळीसगाव), गोपीनाथ फडतरे (वाशी, जि. धाराशिव), चंद्रप्रकाश राऊत (अकोला), हनुमंत शितोळे (पंढरपूर), नानाजी बच्छाव यांना केळीरत्न पुरस्कार तर दीपक कदम (सांगवी, ता. पंढरपूर) यांना केळी विकासरत्न पुरस्कार देण्यात आला.