सोलापूर : संघ परिवाराशी संबंधित सोलापूर जनता सहकारी बँकेला नुकत्याच संपलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात झालेली कर्जवसुली, कर्जवाढ, एकूण व्यवसाय वाढ आणि गुंतवणुकीमुळे मिळालेले वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून लेखापरीक्षणपूर्व ३२ कोटी १७ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. बँकेने केलेल्या धडाकेबाज कर्जवसुलीमुळे बँकेच्या नेट अनुत्पादक कर्जामध्ये (एनपीए) मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन उत्पादक कर्जाचे प्रमाण ५.७७ टक्क्यांपर्यंत तर नेट अनुत्पादक कर्जाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ०.८३ टक्के इतके खाली आले आहे. त्यामुळे बँकेला प्रगतीची झेप घेता आली, असे बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले.
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण ४१ शाखा असून, १९०४ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने १०७४.१६ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले असून, एकूण व्यवसाय २९७८ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेची सभासद संख्या ७० हजार असून, भागभांडवल ७२.१२ कोटी रुपयांचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) १२ टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र, सोलापूर जनता सहकारी बँकेने यातदेखील आघाडी घेतली असून, बँकेची भांडवल पर्याप्तता १८.८० टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही पेंडसे यांनी सांगितले.
बँकेकडून ९०१.२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशोही मागील वर्षाच्या तुलनेत वाढून ८६.३१ टक्के झाला आहे. संघ परिवाराची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या या बँकेने ग्राहक आणि सभासदांच्या सुविधेसाठी नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुरू करण्यासाठीचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे बँकेला नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगची परवानगी मिळण्याची अपेक्षा बँकेचे व्यक्त आहे. या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, संचालक वरदराज बंग, प्राचार्य गजानन धरणे, तज्ज्ञ संचालक सी. ए. गिरीष बोरगावकर, पुरुषोत्तम उडता, संचालिका चंद्रिका चौहान, विनोद कुचेरिया, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, मकरंद जोशी, देवदत्त पटवर्धन आदी उपस्थित होते.