सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा गुरुवारचा सोलापूर दौरा काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीमुळे लक्षवेधी ठरला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांचा अपवाद वगळता शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल आणि माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे आदींनी एकत्र बसून पालकमंत्र्यांसोबत भोजन घेतले. याचवेळी पालकमंत्र्यांसोबत दिलीप माने, दिलीप सोपल व राजन पाटील यांनी बंद खोलीत चर्चा केल्याचे सांगण्यात आले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसानीची तत्कालीन बड्या संचालकांवर भरपाईची जबाबदारी निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवरही पालकमंत्री गोरे यांच्यासमवेत झालेली ही भेट लक्षवेधी मानली जाते.

दोन दिवसांच्या भेटीवर आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट व सोलापुरात विविध भरगच्च कार्यक्रमांना हजेरी लावली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसानीची तत्कालीन बड्या संचालकांवर भरपाईची जबाबदारी निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवरही पालकमंत्री गोरे यांच्यासमवेत झालेली ही भेट लक्षवेधी मानली जाते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालकांमध्ये आमदार दिलीप सोपल, दिलीप माने यांचाही समावेश आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी आपले पॅनेल उभे करण्याच्या हालचाली वाढविल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार दिलीप माने यांनी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आदींना एकत्र घेऊन बाजार समितीची सत्ता राखण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांना भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांची साथ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे स्थानिक आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवून दिलीप माने यांच्या होटगी रस्त्यावरील निवासस्थानी भेट दिली.