शेतजमिनीच्या वाटणीच्या वादामध्ये विरोधात भूमिका घेतल्याने चुलत भावावर बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून केल्याबद्दल तीन सख्या भावांसह चौघा आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच मृताच्या चार वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रूपयांप्रमाणे आठ लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बप्पू ऊर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे (वय ३४), त्याचे वडील शिवानंद महादेव दिंडोरे (वय ६२), बसवराज महादेव दिंडोरे (वय ६५) आणि सिध्दाराम ऊर्फ सिद्राम महादेव दिंडोरे (वय ५४, चौघे रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) अशी या खटल्यातील आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील मृत मल्लिकार्जुन धोंडप्पा दिंडोरे (वय ४२) यांची बहीण भागिरथी आणि आरोपी शरणप्पा व इतरांमध्ये शेतजमिनीचा वाटणीचा वाद होता. बहीण भागिरथी हिच्या हिश्याला येणारी शेतजमीन देण्यास आरोपी टाळाटाळ करीत होते. तेव्हा या वादात मृत मल्लिकार्जुन दिंडोरे यांनी बहिणीच्या बाजूने हस्तक्षेप करून वाद मिटविला होता. परंतु हा वाद आमच्या परस्पर का मिटविला, असा सवाल करीत आरोपींनी मृत मल्लिकार्जुन यांच्याशी वाद घातला. १९ मार्च २०१७ रोजी दुपारी मृत मल्लिकार्जुन दिंडोरे हे आपल्या वस्तीवर आपले बंधू मधुकर व इतरांशी गप्पा मारत थांबले होते. तेव्हा आरोपी बप्पू ऊर्फ शरणप्पा दिंडोरे हा त्याचे वडील आणि चुलत्यांसह दुचाकीने तेथे आला. त्याने शेतजमिनीच्या वाटणीचा वाद आमच्या परस्पर कसा मिटविला, याचा जाब विचारत भांडण काढले आणि सोबत आणलेल्या बंदुकीने मल्लिकार्जुन यांच्यावर गोळी झाडली. बंदुकीची गोळी त्यांच्या डोक्यात कवटीत शिरल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. वळसंग पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होऊन पोलिसांनी तपासाअंती आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्यासमोर झाली. यात सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासले. परंतु त्यापैकी महत्वाचे सहा साक्षीदार सरकार पक्षाच्या विरोधात फितूर झाले. मात्र गुन्ह्यात वापरलेल्या बंदुकीविषयीचा रासायनिक पृथःकरणाचा तज्ज्ञांनी दिलेला अहवाल महत्त्वाचा ठरला. वापरलेली बंदूक आरोपी बप्पू ऊर्फ शरणप्पाच्या मालकीची होती. मृताला लागलेली गोळी त्याच बंदुकीतून सुटलेली होती. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळून आलेले काडतूस व अन्य तुकडे तसेच आरोपीच्या घरात सापडलेली काडतुसे हा परिस्थितीजन्य पुरावा समोर आला. याशिवाय आरोपींनी वापरलेल्या दुचाकींवर त्यांच्या हातांचे ठसे आढळून आले होते. यासंदर्भात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. आरोपींतर्फे ॲड. व्ही. डी. फताटे, ॲड. प्रशांत देशमुख, ॲड. रामभाऊ रिसबूड, ॲड. पी.बी. लोंढे-पाटील आदींनी बाजू मांडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur life imprisonment for four accused in aherwadi murder case msr