सोलापूर : स्थानिक विकासाच्या मुद्यांसह देशाचा विकास आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने सोलापूर लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांना मागील दहा वर्षे भाजपचे खासदार असताना त्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत, स्थानिक विकासाच्या मुद्यावर लक्ष्य केले आहे. तर याउलट आमदार सातपुते हे यापूर्वी ७० वर्षात सोलापूरचा विकास का झाला नाही, असा प्रतिसवाल करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सोलापूरचे उमेदवार असल्याचे सांगत धार्मिक ध्रुवीकरण होण्याच्या दृष्टीने विधाने करीत आहेत. परंतु त्यावर काँग्रेसकडून ‘ मुद्याचं बोला ‘म्हणून भाजपला आव्हान दिले जात आहे.

मूळ संघ परिवारातून आलेले माळशिरसचे तरूण आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात भाजपने उतरविल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांच्या उपरेपणावर बोट ठेवून याच मुद्यावर त्यांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मागील दहा वर्षे सोलापूरचे खासदार भाजपचे असताना त्यांच्या निष्क्रियतेमुळे सार्वत्रिक नाराजीचा लाभ उठवत दहा वर्षे विकासाअभावी वाया गेली असून आता तिस-यांदा भाजपने उमेदवार बदलून उप-याला आयात केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. त्यावर खुलासा करण्यातच आमदार सातपुते यांचा वेळ खर्च होत असताना दुसरीकडे त्यांनी काँग्रेसवर पलटवार करताना प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीकेचे बाण सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यावरसुध्दा प्रणिती शिंदे यांनी, तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे, माझ्याशी भिडा, वडिलांना का भिडता, असा सवाल करीत जनतेसमोर ‘लेक’ म्हणून नाते निर्माण करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते.

हेही वाचा : “मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”, बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

मागील सलग दहा वर्षे भाजपचे दोन खासदार असताना प्रलंबित जून्या विमानतळासह बोरामणी आंतरराष्ट्रीय काॕर्गो विमानतळ व अन्य प्रश्नावर सोलापूरचा विकास हरवला आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकाही तालुक्याला एक पैशाचीही दुष्काळी मदत मिळू शकली नाही, असे आक्षेपार्ह मुद्दे उपस्थित केले जात असताना भाजपकडून सोलापूरचा उमेदवार पंतप्रधान मोदी हेच आहेत, असे समजून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु त्याविरोधात काँग्रेसकडून ‘मुद्याचं बोला’ म्हणून तशा आशयाचे फलक प्रचारात झळकावले जात आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच प्रचारात रंग भरत चालल्याचे दिसून येते.