सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्या तुल्यबळ लढतीत दोन्ही बाजूंचा प्रचारा शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रचारसभा येत्या २९ एप्रिल रोजी होणार आहे. या सभेसाठी होम मैदानावर जय्यत तायारी सुरू आहे. दुसरीकडे लहानमोठ्या प्रचार सभांसह गावभेटी आणि कुटुंब भेटीबरोबरच घरोघरी जाऊन प्रचार होत आहे.
हेही वाचा >>> बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी मिळण्याअगोदर प्रचाराला जोरदार सुरूवात केली होती. तर भाजपचे राम सातपुते यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचारात उतरले असता दोन्ही उमेदवारांकडून आक्रमक पध्दतीने प्रचाराला गती मिळाली आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघात तीन-तीनवेळी प्रचाराच्या फे-या पूर्ण केल्या आहेत. काँग्रेससाठी राहुल गांधी यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या सभा होत आहेत. याशिवाय काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम आणि अमित देशमुख या यंग ब्रिगेडच्या नेत्यांच्याही सभा झाल्या आहेत. प्रचाराचीमुख्य कमान स्वतः प्रणिती शिदे सांभाळत असताना दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे मुख्य किल्ला लढवत आहेत. येत्या २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्मिती होईल, असा विश्वाहा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बाळगला आहे. भाजपकडून आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे दौरे झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी दुस-या दौ-यात सोलापुरातील पक्षाच्या पदाधिका-यांसह काही माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. याशिवाय सोलापूर जिल्हा यंत्रमागधारकश संघाचे अध्यआक्ष पेंटप्पा गड्डम यांच्याबरोबर यंत्रमाग कारखानदारांशी संवाद साधला. काशीच्या जंगमवाडी मठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, शरण मठाचे मठाधिपती आदींच्याही भेटी पाटील यांनी घेतल्या. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी स्वतः आपल्या मतदारसंघात घरोघरी जाऊन भाजपच्या प्रचारावर भर दिला आहे.