सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात एकीकडे एमआयएमने उमेदवार उभा केलेला नसताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपविरोधी मतविभागणी टाळण्यासाठी आपण माघार घेतल्याचे सांगताना गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकारिणीची कार्यपध्दती आंबेडकरी चळवळीला पोषक नसल्याचा आरोप केला आहे.
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात मुख्य तुल्यबळ लढत होत असताना त्यात वंचित बहुजन आघाडीचे राहुल काशीनाथ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी प्रचाराला सुरूवात करण्यापूर्वी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद वाढविला होता. परंतु सोमवारी दुपारी त्यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या दालनात जाऊन गायकवाड हे उमेदवारी अर्ज मागे घेत असताना तेथे वंचित बहुजन आघडीचे जिल्हाध्यक्ष मडिखांब हे धावत आले. त्यांच्या हालचाली पाहून निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण करून मडिखांब यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. नंतर त्यांची सुटका झाली.
हेही वाचा : “राहुल गांधींनी स्वप्नात जरी विचार केला तरी…”; मुख्यमंत्री शिंदेंचा इंडिया आघाडीवर निशाणा
उमेदवारी माघार घेण्याच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट करताना गायकवाड यांनी सोलापुरात आंबेडकरी जनता चळवळीसाठी संवेदनशील आहे. मात्र पक्षाची कार्यकारिणी चळवळीसाठी पोषक नाही. त्यात पोकळपणा आहे. काही अपवाद वगळता अनेक दलालांची घुसखोरी झाली आहे. त्यांना सोबत घेऊन आपण निवडणुकीची लढाई करू शकत नाही. दुसरी बाब म्हणजे आपल्या उमेदवारीमुळे भाजपविरोधी मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल आणि भाजपच्या विजयाचे वाटेकरी आपण होऊ इच्छित नाही. भाजपचा डॉ. आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा डाव आहे. त्यासाठी त्या पक्षाचा खासदार निवडून पाठविण्यात आपला हातभार लागू नये म्हणून आपण उमेदवारी मागे घेतली आहे, असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले.
मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाची मदत घेऊन उभे राहून एक लाख ७० हजार मते घेतली होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे एक लाख ५८ हजार मतांनी पराभूत झाले होते. भाजपविरोधी मतविभागणीमुळे भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडून आले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होणार की काय, याबाबत प्रश्नार्थक चर्चा सुरू होती. त्यात एमआयएमने उमेदवार उभा न करण्याची भूमिका घेतली. तर वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा भाजपविरोधी किमान मतविभागणी होण्याची शक्यता वर्तविली जात असताना अखेर गायकवाड यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दिलासा मिळाल्याचे मानले जाते.