सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी भाजपच्या काही नेत्यांनीही हातभार लावला आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी हातभार लावणारे भाजपचे नेते कोण, याची चर्चा सुरू आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या थेट लढत होऊन त्यात ७४ हजार ८१५ मतांची आघाडी घेऊन प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला आणि आपले वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या मागील सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढला होता. या निवडणुकीचे कवित्व अजूनही सुरू आहे.
हेही वाचा…राज्यातील ओबीसी-मराठा वादावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “जर आरक्षणाठी…”
लोकसभा निवडणुकीत मतदार जनतेने निवडून दिल्याबद्दल तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मोठी साथ दिल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी कृतज्ञता मेळावे आयोजिले आहेत. त्याचाच भाग म्हणून अक्कलकोट रस्त्यावरील राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात रविवारी दुपारी आयोजित कृतज्ञता मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. त्यावेळी त्यांनी, आपल्या कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपच्या काही नेत्यांनीही मतदान केले आणि निवडून आणण्यासाठी हातभार लावला, असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे कृतज्ञता मेळाव्यात लगेचच भाजपच्या संबंधित नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली. मात्र प्रणिती शिंदे यांना मतदान करून निवडून आणण्यासाठी हातभार लावणारे भाजपचे नेते नेमके कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…सातारा: पोलीस अधीक्षकांना दोन प्रकरणात उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
लोकसभा निवडणुकीत भाजपअंतर्गत गटबाजी सुप्त स्वरूपात पाहायला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनीही भाजपच्या काही ने भेट घेतली होती. यावरून भाजपमध्ये संशयाचे धुके निर्माण झाले होते. यातूनच अखेर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांनी प्रणिती शिंदे यांना केलेल्या मदतीचा उल्लेख केल्यामूळे हा चर्चेचा विषय झाला आहे.