सोलापूर : माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गौण खनिजविषयक बाबींमध्ये करावयाची कारवाई असमाधानकारक असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना विभागीय चौकशीनंतर निलंबित करण्यात आले.
माढा तालुक्यातील उजनी धरण कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार रणवरे यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून तहसीलदार माढा यांच्या विरोध निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला होता.
तहसीलदार रणवरे यांना स्पष्ट आदेश देऊनही त्यांनी अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर परिणामकारक आळा घातला नाही. अवैध गौण खनिज प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई केलेली नसणे, खाणपट्टा मंजुरीच्या अनुषंगाने मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतरही वरिष्ठ कार्यालयास सादर न करणे आदी स्वरूपात कर्तव्य कुचराई केल्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कठोर कारवाई सुरूच राहील
माढा तालुक्यातील अवैध वाळू उपश्यावर नियंत्रण न ठेवणे व अन्य प्रशासकीय बाबीतील अनियमिततेमुळे माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला होता, त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यापुढे अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण न ठेवणे तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर अशीच कठोर कारवाई करण्यात येईल.-कुमार आशीर्वाद,जिल्हाधिकारी, सोलापूर