सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था तातडीने उपलब्ध करण्याचे आदेश सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र सुविधा तत्काळ करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन समितीच्या भवनात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. शासकीय व निमशासकीय कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्यासाठी आणि सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आवश्यक निधी नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयांच्या परिसरात महिलांसाठी स्वतंत्र शौचालये उभारण्यात आली आहेत. परंतु, जिल्हा परिषद किंवा अन्य राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये शौचालयांची व्यवस्था नसल्याबद्दल गोरे यांनी नाराजी व्यक्त केली.
मागील आर्थिक वर्षात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सहा कोटी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अधिपत्याखालील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाला सात कोटी रुपये औषधे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. संबंधित यंत्रणांनी औषधे खरेदी केल्यानंतर त्याचा वापर योग्य प्रकारे होत आहे की नाही, याची पडताळणी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत करावी, असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेतून शहर पोलीस आयुक्तालयास अकरा नवीन चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पोलीस आयुक्तालयात पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सर्व वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.