सोलापूर : राज्यातील महायुती सरकारने मराठ्यांसह धनगर समाजालाही फसविले आहे. एका हाताने देऊन मतांचे राजकारण करायचे आणि सत्ता संपादन केल्यानंतर दुसऱ्या हाताने वाटोळे करायचे. वाटोळे करणारे तेच आणि नंतर समजावून सांगणारेही तेच, अशी महायुती सरकारची फसवी पद्धत आहे. त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील शांतता संवाद यात्रेची सुरुवात सोलापुरातून केली. रात्रीच्या मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सांगलीकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.
मराठा आरक्षण आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी कोणतेही टीकात्मक भाष्य न करता केवळ देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर तुटून पडता, या प्रश्नावर जरांगे-पाटील म्हणाले, की मराठा समाजाचे कोणी वाटोळे केले, हे या समाजाला चांगलेच ठाऊक आहे. म्हणून तर आम्ही राज्यात सत्तांतर घडवून भाजपला निवडून दिले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत आपण काय बोललो, हे समाजमाध्यमांमध्ये आजही पाहायला मिळेल. शासनाने आरक्षण प्रश्नावर १३ तारखेपर्यंत मुदत मागितल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल नंतरच बोलू, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : CM Eknath Shinde : ‘रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय नको’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकऱ्यांना सूचना
ते म्हणाले, की महायुती शासनाने जसे मराठा समाजाला फसविले, तसे धनगर समाजालाही फसविले आहे. सत्तेत येताना देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आपल्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजतागायत धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजालाही यापूर्वी १३ टक्के ओबीसी आरक्षण जाहीर केले. नंतर मागणी नसताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे आरक्षण दिले. कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु यांपैकी काहीही मराठा समाजाच्या हातात पडले नाही. ही फसवणूक आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठा समाज पूर्वीपासून धनगरांसह ओबीसी, मुस्लिमांसह बारा बलुतेदारांशी सौहार्दाचे संबंध बाळगून आहे. गावखेड्यात दररोज एकमेकांशी व्यवहार करताना कोठेही वाद होत नाही. परंतु महायुतीचे नेते आमच्यात भांडण लावण्याचा डाव खेळत आहेत. परंतु आमची मने दूषित होणार नाहीत, असा विश्वासही जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला. मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळाल्यानंतर मग धनगर, मुस्लीम, लिंगायत व इतरांना त्यांच्या हक्काचे आरक्षण कसे मिळत नाही, ते पाहू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.