सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या एका प्रसूतिगृहात जन्मलेल्या एका नवजात बाळाची चोरी करण्याचा प्रयत्न उजेडात आला असून याप्रकरणी एका ५३ वर्षांच्या पुरुषाला तत्काळ पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास लष्कर भागातील सोलापूर महापालिकेच्या प्रसूतिगृहात हा प्रकार घडला. सुदैवाने नवजात बाळ सुखरूपपणे मातेला परत मिळाले आहे.
याबाबत लक्ष्मीबाई गणेश हजारीवाले (वय ३८, रा. लोधी गल्ली, उत्तर सदर बाजार, सोलापूर) हिने सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची गरोदर असलेली मुलगी भारती चौधरी ही प्रसूतिगृहात बाळंतपणासाठी दाखल झाली होती. काल मंगळवारी दुपारी १२.५५ वाजता ती प्रसूत झाली. त्यानंतर भारती हिला नवजात बाळासह रुग्णालयात महिला वाॅर्डातील खोलीत ठेवण्यात आले होते. परंतु पहाटे अडीचच्या सुमारास अचानकपणे तिच्या खोलीत प्रवेश केलेल्या एका पुरुषाने झोपलेली बाळंतीण माता भारती हिचे नवजात बाळ पाळण्यातून चोरून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला.
परंतु सुदैवाने हा संशयास्पद प्रकार रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आला. त्या कर्मचाऱ्याने त्या पुरुषाला हटकले असता त्याच्या ताब्यात नवजात बाळ आढळून आले. या नवजात बाळाची चोरी करून नेण्याचा प्रयत्न फसला. त्याच्या ताब्यातील नवजात बाळ परत घेऊन मातेच्या हवाली करण्यात आले. संबंधित संशयित पुरुषाचे नाव संतोष प्रभाकर सातपुते (रा. लोणारी गल्ली, उत्तर कसबा, सोलापूर) असे आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.