सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित विधानाच्या निषेधार्थ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी काल अचानकपणे काम बंद आंदोलन केले. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी आणलेला सुमारे ५० हजार क्विंटल कांदा वाहनांमध्येच पडून राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आक्रमक होत बाजार समितीसमोर मुंबई- हैदराबाद महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.
राज्यात चौथ्या क्रमांकाची समजल्या जाणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दररोज कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नेहमीप्रमाणे काल बुधवारी रात्री शेतकऱ्यांनी वाहनांतून कांदा विक्रीसाठी आणला असता माथाडी कामगारांनी शहा यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन सुरू केले. हे आंदोलन अचानकपणे सुरू झाल्याने बाजार समितीमध्ये गोंधळ उडाला. एकापाठोपाठ एक कांदा वाहतुकीची शेकडो वाहने बाजार समितीबाहेर रांगेत थांबविण्यात आली होती. माथाडी कामगारांनी वाहनांमधील कांदा उतरवून घेण्यास नकार दिला. या आंदोलनामुळे कांदा वाहनांमधून खाली उतरविला न जाता तसाच अडकून राहिल्यामुळे शेतकरी हतबल झाले.
हेही वाचा – सोलापूर : बार्शीजवळ मोटारीची धडक बसून दुचाकीवरील महिलेसह दोघांचा मृत्यू
माथाडी कामगार आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे कांदा लिलाव होऊ शकला नाही. रात्रभर शेकडो शेतकरी रस्त्यावर थंडीच्या गारठ्यात उघड्यावर राहिले. सकाळीही हीच स्थिती कायम राहिल्याने शेतकऱ्यांचा संयम ढळला. आंदोलन पूर्वसूचना न देता अचानकपणे सुरू झाल्यामुळे आपली गैरसोय झाल्याबद्दल शेतकरी संतप्त झाले. यातून काहीही मार्ग निघत नसल्याचे पाहून शेतकरी रस्त्यावर उतरले. बाजार समितीबाहेरील चौकात, पुणे-हैदराबाद महामार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे कांदा वाहतुकीच्या वाहनांसोबत दोन्ही बाजूकडील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची प्रचंड कोंडी झाली. तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबरजे व इतरांनी शेतकऱ्यांचा कांदा उतरवून घेण्याचे आणि उद्या, सकाळी कांद्याचा लिलाव करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. उद्या लिलावासाठी अन्य कांदा येऊ देणार नाही. आज आलेल्या कांद्याचे भावही पडू देणार नाही, अशी ग्वाही उंबरजे यांनी दिली.
हेही वाचा – कांद्याची आवक वाढल्याने सोलापुरात कांदा दरात घट
े
े
यावेळी कांदा उत्पादक शेतकरी आंदोलकांनी बाजार समितीतील गैरव्यवस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. रात्री कडाक्याच्या थंडीत मुक्काम करण्याच्या अडचणीसह बाजार समितीच्या शेतकऱ्यांसाठी एक रुपयात भोजन योजनेचा फोलपणा समोर आणला.