सोलापूर : मृत नातलगाच्या तिसर्‍या दिवशी माती सावडण्यासाठी स्मशानभूमीकडे जाताना भल्या सकाळी जडवाहतुकीने एका दुचाकीस्वाराचा बळी घेतला पत्नीच्या डोळ्यांदेखत पती सिमेंटवाहू बल्करसारख्या जड वाहनाखाली चेंगरला आणि त्याच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले. ही थरकाप उडविणारी दुर्घटना शहरात अक्कलकोड रोड शांती चौकात हिंदू स्मशानभूमीजवळ घडली.

सुनील शिवाजी पवार (वय ४२, रा. स्वागत नगर, कुमठा नाका, सोलापूर) असे या दुर्घटनेतील मृताचे नाव आहे. यात त्याची पत्नी बालंबाल बचावली तरी तिच्या नशिबी वैधव्य आले आहे. याप्रकरणी बलकर चालकाविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा…ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात असल्याच्या शिंदे गटाच्या दाव्याला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

सोलापूर शहरात दिवसभर जड वाहतुकीला कायदेशीर बंदी आहे. मात्र तरीही कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे जड वाहतूक राजरोसपणे सुरू असते. सुनील पवार यांच्या मृत्यू झालेल्या एका नातलगाच्या तिसर्‍या दिवशी माती सावडण्यासाठी सुनील पवार हे आपल्या पत्नीसह दुचाकीवर बसून घराकडून अक्कलकोडरस्त्यावरील शांती चौकाजवळ हिंदू स्मशानभूमीकडे निघाले होते. स्मशानभूमीच्या जवळ पोहोचले असतानाच त्यांना एका बलकरने ठोकरले.

हेही वाचा…लोकसभेला महाराष्ट्रात भाजपाला कशाचा फटका बसला? रावसाहेब दानवे म्हणाले, “राजकीय वातावरणात…”

जोरात धक्का बसल्याने पवार दाम्पत्य दुचाकीवरून बाजूला फेकले गेले. मागील चाकाखाली सुनील पवार हे चेंगरून जागीच मृत्युमुखी पडले. तर पत्नी दुसरीकडे बाहेर फेकली गेल्याने थोडक्यात बचावली. मात्र तिच्या डोळ्यांदेखत पतीच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत सुनील पवार हे मूळचे तुळजापूर तालुक्यातील राहणारे असून रोजगारासाठी ते सोलापुरात सासरी राहात होते.