सोलापूर : सोलापूर महापालिकेचा पुढील २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी स्वतःच्या ७१० कोटी ७० लाख रूपयांच्या उत्पन्नासह शासकीय अनुदान आणि कर्ज मिळून एकूण ११५७ कोटी २३ लाख १६ हजार ४०१ रूपयांचा अर्थसंकल्प पालिका प्रशासक शीतल तेली-उगले यांनी सादर केला आहे. कोणतीही कर आणि दरवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात खर्चाचा एकूण ३३९ कोटी रूपयांएवढा निम्मा भार मनुष्यबळाच्या वेतन व भत्त्यासह निवृत्तिवेतन आणि कुटुंब वेतनावरच असल्याची बाब समोर आली आहे. महापालिका करापासून १३९ कोटी ८१ लाखांचे एवढे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. तर सर्वाधिक ४५ टक्के म्हणजे ३२० कोटी ८२ लाखांचे उत्पन्न महसुली अनुदानातून हिशेबात धरण्यात आले आहे.
६० वर्षे जुन्या मात्र ड वर्गात असलेल्या सोलापूर महापालिकेत गेल्या पावणेदोन वर्षांपासून प्रशासकीय कारभार चालतो. प्रशासक शीतल तेली-उगले यांनी आगामी २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना त्यात प्रामुख्याने उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी योजनेला गती देण्यासह जल निसाःरण आणि मलनिसाःरण योजना मार्गी लावण्यावर भर दिला आहे. महापालिकेच्या मालकीच्या भाड्याने दिलेल्या सर्व मालमत्तांचा येत्या दोन महिन्यात फेरआढावा घेऊन भाडे कराराची मुदत संपलेल्या मालमत्तांचा नव्याने भाडेकरार केला जाईल. तसेच मुदत संपूनही वर्षानुवर्षे महापालिकेच्या ताब्यात नसलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रशासक तेली-उगले यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘पवार कुटुंबा’वर बोलताना अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “आमच्या घरातील…”
महापालिकेच्या स्वउत्पन्नातून तयार केलेल्या ७१० कोटी ६९ लाख ५९ हजार रूपयांचा अर्थसंकल्प दोन कोटी ५७ हजार ४०१ रूपये शिल्लक दर्शविणारा असून यात महसुली विभागात ५३१ कोटी ५० लाख, पाणीपुरवठा विभागात १२१ कोटी ३३ लाख १० हजार आणि भांडवली विभागात ५७ कोटी ८६ लाख ४९ हजार रूपयांची रक्कम दर्शविण्यात आली आहे. जमेच्या बाजूने कर उत्पन्न-१३९ कोटी ८१ लाख ५३ हजार रूपये (१९.६७ टक्के), निश्चित महसुली उत्पन्न-१४ कोटी १० लाख ३८ हजार रूपये (१.९८ टक्के), महापालिकेच्या मालमत्तेपासून भाडे-२२ कोटी ५२ लाख रूपये (३.१७ टक्के), शुल्क आणि वापरकर्ता शुल्क-१०६ कोटी ८३ लाख रूपये (१५.०३ टक्के), महसुली अनुदान-३२० कोटी ८२ लाख ३५ हजार रूपये(४५.१४ टक्के), पाणीपुरवठा जमा-८४ कोटी ३६ लाख २८ हजार रूपये (२.४१ टक्के), गुंतवणुकीपासून उत्पन्न-२० कोटी रूपये (०.२८ टक्के), भांडवली जमा-१७ कोटी रूपये (२.४१ टक्के) आदी बाबींचा समावेश आहे. तर खर्चाच्या बाजूने पाणीपुरवठ्याशिवाय वेतन व भत्त्यांसाठी सर्वाधिक ३१.११ टक्के म्हणजे २२१ कोटी ८ लाख ११ हजार रूपयांची तरतूद दाखविली आहे. याशिवाय निवृत्तीवेतन व कुटुंब वेतनावर १६.५९ टक्के म्हणजे ११७ कोटी ९३ लाख गृहीत धरले आहेत. वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन व कुटुंब वेतनासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या निम्मा एकूण ४७.७० टक्के म्हणजेच एकूण ३३९ कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. याशिवाय प्रशासकीय खर्चासाठी १७ कोटी ११ लाख ७१ हजार रूपयांची (२.४१ टक्के) तरतूद आहे. तर देखभाल व दुरूस्तीवर ६७ कोटी २९ लाख ७५ हजार रूपये (९.४७ टक्के) खर्च होणार आहेत. तसेच कार्यक्रम आणि योजनांवर ५१ कोटी ७३ लाख ४९ हजार रूपये (७.२८ टक्के),करावरील सवलत अणि परताव्यापोटी १७ कोटी ७० लाख रूपये (२.४९ टक्के) अपेक्षित धरण्यात आले आहेत. पाणीपुरवठ्यावरील खर्च १२१ कोटी ७६ लाख रूपये गृहीत धरला आहे. याशिवाय प्रभागनिहाय विकास कामे-१२ कोटी १८ लाख, विविध योजनांसाठी पालिकेचा हिस्सा-४० कोटी ५८ लाख शहर विकास आराखडा तयार करणे-३ कोटी याप्रमाणे खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा : “माझं येणं आणि नारायण राणेंचं जाणं…”, अशोक चव्हाणांनी सांगितली भाजपाची निवडणुकीची योजना
केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे एकूण अनुदान ३६९ कोटी ७१ लाख एवढे दर्शविण्यात आले असून यात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान पाणीपुरवठा योजना-९० कोटी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान पाणीपुरवठा योजना-५० कोटी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान मलनिःसारण योजना-५० कोटी, अमृत योजना मलनिःसारण-१६ कोटी, चौदावे आणि पंधरावे वित्त आयोग अनुदान-३० कोटी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्त्यांमधील विकास कामे अनुदान-२० कोटी, एनटीपीसी-उजनी दुहेरी जलवाहिनी योजना-२० कोटी, उड्डाणपूलांसाठी भूसंपादनापोटी शासन हिस्सा अनुदान-३४ कोटी ७१ लाख, पर्यावरण राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अनुदान-१० कोटी, पायाभूत सोयी-सुविधांसाठी विशेष अनुदान-१० कोटी, नागरी घनकचरा व्यवस्थापन-१५ कोटी, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी घरकूल योजना-रमाई आवास योजना-१० कोटी, प्रधानमंत्री आवास योजना-३ कोटी आदी कामांचा समावेश आहे.