सोलापूर : मर्यादित उत्पन्न असलेल्या सोलापूर महापालिकेचा आगामी २०२५-२६ वर्षाचा कोणतीही कर वा दरवाढ नसलेला एकूण १२९३ कोटी ३० लाख १३ हजार ४०१ रुपयांचा अर्थसंकल्प पालिका प्रशासक डॉ. सचिन ओंबासे यांनी मांडला. हा अर्थसंकल्प प्रशासनाच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून आस्थापनेवरील खर्च आखून दिलेली मर्यादा ओलांडत ४३ टक्क्यांवर गेल्याचे दिसून येते.

दोन लाख ५७ हजार ४०१ रुपये शिल्लक दर्शविणाऱ्या अर्थसंकल्पात जमेच्या बाजूने महसुली विभागासह पाणीपुरवठा आणि भांडवली विभाग मिळून एकूण ७७३ कोटी १३ लाख ५६ हजार रुपये दर्शविण्यात आले आहेत. तसेच शासन अनुदान ४२३ कोटी ५३ हजार आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, मलनिःसारण योजनेचा पालिकेचा हिस्सा कर्ज ९६ कोटी ६१ लाख गृहीत धरण्यात आले आहेत. महसुली जमेमध्ये ५८५ कोटी १७ लाख २९ हजार, पाणीपुरवठ्यात १२८ कोटी २८ लाख २७ हजार आणि भांडवलीमध्ये ५९ कोटी ६८ लाख रुपयांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मिळकत कर उत्पन्न-१४६ कोटी ५२ लाख (१८.९५ टक्के), निश्चित महसुली उत्पन्न-१८ कोटी ५३ लाख (२.४० टक्के), महसुली अनुदान-३४५ कोटी ४२ लाख ३५ हजार (४४.६८ टक्के), शुल्क आणि वापरकर्ता शुल्क-९८ कोटी ६८ लाख ९३ हजार (१२.७६ टक्के), पाणीपुरवठा जमा-८६ कोटी २८ लाख ४५ हजार (११.२६ टक्के), विक्री आणि भाडे-४१ कोटी ८० लाख ७५ हजार (५.४१ टक्के), महापालिकेच्या मालमत्तेपासून भाडे उत्पन्न-१५ कोटी ५७ लाख ५० हजार (२.०१ टक्के), भांडवली जमा-१७ कोटी (२.२० टक्के), दिलेल्या कर्जावरील व्याज-१० लाख ५० हजार (०.०१ टक्के) आणि इतर उत्पन्न-१ कोटी २० लाख (०.१६ टक्के) याप्रमाणे जमेची बाजू दाखविली गेली आहे. भांडवली कामांसाठी उपलब्ध होणाऱ्या रकमेमध्ये विकास शुल्क-१६ कोटी, गुंठेवारी क्षेत्रात मूलभूत सोयी करणे-एक कोटी आणि महसूल निधीतून भांडवली कामांसाठी वर्ग होणारी रक्कम-४२ कोटी ६८ लाख गृहीत धरण्यात आली आहे.

खर्चाच्या बाजूने वेतन व भत्ते (पाणीपुरवठा व्यतिरिक्त)-२१५ कोटी ८६ लाख ९१ हजार (२७.८२ टक्के) आणि निवृत्ती वेतन व कुटुंब वेतन- १२३ कोटी ६८ लाख (१६ टक्के) दुरुस्ती-११३ कोटी ३९ लाख ५० हजार हजार (१४.६७ टक्के), पाणीपुरवठा खर्च-१२८ कोटी २८ लाख २७ हजार (१६.५९ टक्के), भांडवली खर्च-५९ कोटी ६८ लाख (७.७२ टक्के), कार्यक्रम व योजनांवरील खर्च-५२ कोटी ६४ लाख ६२ हजार (६.८१ टक्के), महसुली अनुदाने, देणग्या-१८ कोटी ८८ लाख २० हजार (२.४४ टक्के), करावरील सवलत आणि परतावा-१७ कोटी (२.२० टक्के), कर्जावरील खर्च-१३ कोटी ३५ लाख ७४ हजार (१.७३ टक्के), प्रशासकीय खर्च-१५ कोटी २४ लाख २० हजार (१.९७ टक्के) असा तपशील मांडण्यात आला आहे. याशिवाय प्रभागनिहाय कामे-१३ कोटी ४४ लाख, विविध योजनांसाठी महापालिकेचा हिस्सा-४० कोटी ७९ लाख, गुंठेवारी-एक कोटी, शहर विकास आराखडा तयार करणे-४ कोटी या बाबी दर्शविण्यात आल्या आहेत.

प्रशासक डॉ. सचिन ओंबासे यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका शाळांचा कायापालट करण्यासाठी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या धर्तीवर प्रयोगादाखल दोन शाळांची निवड करण्यात येणार आहे. मालमत्ता कर विभाग, अंतर्गत संरचनात्मक, करविषयक सुधारणा, तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यातून अद्यापि कर संरचनेत नसणाऱ्या मिळकती, वापरात बदल झालेल्या मिळकती, वाढीव बांधकाम, अनधिकृत बांधकाम झालेल्या मिळकतींचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण आणि कर आकारणी करण्यासाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा सुधारणा, रखडलेले दोन उड्डाणपूल, उजनी-सोलापूर थेट समांतर जलवाहिनी योजना आदी कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. शहरात महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर (बीओटी) काही प्रकल्प राबविण्याचा मनोदय डॉ. ओंबासे यांनी बोलून दाखविला. यावेळी पालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे आणि वित्त आणि लेखा अधिकारी रत्नदीप जवळगेकर हे उपस्थित होते.