Old Pension Scheme Employee Schemeजुन्या पेन्शनसाठी राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनाचा बेमुदत संप बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच असताना सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी मात्र या संपातून माघार घेतली आहे. संप न करता काळ्या फिती लावून काम करीत संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय सोलापूर महापालिका कर्मचारी संघटना कृती समितीने घेतला आहे.

काल मंगळवारी पहिल्या दिवशी महापालिकेत एकूण ५४२१ कर्मचाऱ्यांपैकी ३४६५ कर्मचारी संपावर होते. त्यामुळे पालिका प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी संपकरी कर्मचाऱ्यांनी पवित्रा बदलल्याचे दिसून आले.पालिका कामगार संघटना कृती समितीचे नेते अशोक जानराव यांनी बदललेल्या भूमिकेची माहिती दिली. महापालिकेत विविध नागरी सेवा-सुविधा देण्याचे काम असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ही गैरसोय होऊ म्हणून कर्मचाऱ्यांनी संप न करता जुन्या पेन्शनसाठी काळ्या फिती लावून काम करण्याचा आणि कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय कर्मचारी संघटना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जानराव यांनी सांगितले. त्यानुसार महापालिकेत कर्मचारी सेवेत हजर झाल्यामुळे तेथील कामकाज सुरळीत झाले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, कर वसुली आदी विभागांचे कामकाज सुरू झाले आहे.

Story img Loader