सोलापूर : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांचा वारस कोण, हा मुद्दा सार्वत्रिक उत्सुकतेचा असताना दुसरीकडे याच जागेवर उमेदवारी मिळण्यासाठी स्थानिक मुस्लीम समाजाच्या काही नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. उमेदवारी डावलल्यास केवळ सोलापूर शहर मध्यच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा जागांवर महाविकास आघाडीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही या नेत्यांनी दिला आहे.

काँग्रेस, एम आय एम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असा प्रवास केलेले बाहुबली नेते, माजी नगरसेवक तोफिक शेख व त्यांचे बंधू काँग्रेसचे माजी महापौर आरीफ शेख यांच्यासह माजी नगरसेवक हाजी तोफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी, शौकत पठाण आदी नेत्यांनी एका पत्रकार परिषदेत काँग्रेससह महाविकास आघाडीला बंडखोरीचा सूचक इशारा दिला.

हेही वाचा :१३ कोटींची जमीन शिर्डी संस्थानला मोफत; वित्त विभागाचा विरोध डावलून सरकारचा निर्णय, क्रीडा संकुल उभारणीचा प्रस्ताव

तोफिक शेख यांनी ‘अभी नही तो कभी नही’ या शब्दात आक्रमक पवित्रा घेतला. सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात मुस्लीम समाजाने दिलेला सहयोग महत्त्वाचा होता. मुस्लीम आणि मागासवर्गीयांच्या विरोधात धोरण राबविणारे भाजपला रोखण्यासाठी या दोन्ही समाजाने काँग्रेसला साथ दिली. त्याची पोच म्हणून आता आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मतदारसंघात काँग्रेसने मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीच्या विरोधात प्रसंगी बंडखोरी केली जाईल. जिल्ह्यातील सर्व अकरा जागा महाविकास आघाडीला गमवाव्या लागतील, असा स्पष्ट सूचक इशाराही तोफिक शेख यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या स्वतःच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातून केवळ ७९६ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तरी या पक्षाच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अशा पल्लवित झाल्या आहेत. यातच भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांकडून धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजातील काही नेत्यांनी उमेदवारी मिळण्यासाठी सतत धोशा लावल्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : Video : “तुला कोणी लंकेंनी पाठवलं का?”, घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यावर भर सभेत अजित पवार संतापले; नेमकं काय घडलं?

उमेदवारीचा आग्रह धरणारे तोफिक शेख यांचा उदय २० वर्षापूर्वी काँग्रेसमधून झाला होता. नंतर त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा वाढल्या. परिणामी, २०१४ साली विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदार संघाची जागा त्यांनी थेट एमआयएमसारख्या पक्षाच्या माध्यमातून लढवून तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना अक्षरशः झुंजविले होते. नंतर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात एका महिलेच्या खून प्रकरणात अटक झाल्यामुळे पुढे २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने त्यांना डावलले होते. त्यामुळे शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आगामी विधानसभेसाठी मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी करणाऱ्या या नेत्यांमध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता अनेकजणांवर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्यावर तडीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा झाली होती.