सोलापूर : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या NEET परीक्षेतील कथित घोटाळ्याचे धागेदोरे लातूर आणि धाराशिवपर्यंत पोहोचले असताना याच प्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील सहशिक्षक संजय तुकाराम जाधव याचेही नाव जोडले गेल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे त्याची चौकशी सुरू केली आहे. तो गेल्या १२ जूनपासून विना परवानगी शाळेत गैरहजर आहे. दरम्यान, शाळेतील त्याचे कपाट सील करण्यात आले आहे.
NEET परीक्षेतील कथित घोटाळ्याप्रकरणी संशयित म्हणून नांदेडच्या एटीएस विभागाने संजय जाधव यास अटक केली आहे. जाधव हा माढा तालुक्यातील टाकळी टेंभुर्णी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नेमणुकीस आहे. तो पूर्वी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमणुकीस होता. मागील २०२३-२४ शैक्षणिक वर्षात आंतराजिल्हा बदली करून तो सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रुजू झाला होता. आपली पत्नी मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करून त्याने अक्कलकोट तालुक्यात बदलीसाठी अर्ज केला होता.
हेही वाचा : शरद पवारांवर अजित पवार गटाची जोरदार टीका, “पक्षाचे दरवाजे उघडे ठेवत आहात, याचाच अर्थ…”
दरम्यान, NEET परीक्षेतील कथित घोटाळ्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहशिक्षक जाधव याचे नाव समोर आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तात्काळ चौकशी करण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना आदेश दिले होते. त्यानुसार माढयाचे गट शिक्षणाधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी शोभा लोंढे, केंद्र प्रमुख फिरोज मनेरी या तिघांची चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने टाकळी टेंभूर्णी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समितीकडे चौकशी केली, गेल्या १२ जूनपासून सहशिक्षक संजय जाधव विना परवानगी गैरहजर असल्याचे दिसून आले. शाळेतील त्याचे कपाट सील करण्यात आले आहे. त्याने स्वतःच्या बदलीसाठी पत्नी मनोरुग्ण असल्याबाबतचे दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र तपासण्यात आले असून बुलढाणा येथून हे प्रमाणपत्र काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.