सोलापूर : न्यायालयीन खटल्यात हजर राहण्यासाठी न्यायालयात आलेल्या आरोपीला न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय अटक करून न्यायालयीन प्रक्रियेस अडथळा आणल्याप्रकरणी चार पोलिसांच्या विरोधात संबंधित आरोपीने न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर दखल घेत न्यायालयाकडून सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी याबाबतचा आदेश सरकार पक्षाला दिला आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे राहणाऱ्या सुनील घोडके खून खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राणे यांच्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या १२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने आरोपींचा जबाब नोंदविण्यासाठी तारीख नेमली होती. या खटल्यातील आरोपी असलेले रोहन एडके आणि अक्षय एडके ठरल्याप्रमाणे त्या दिवशी तारखेला हजर राहण्यासाठी न्यायालयात आले होते. परंतु मोहोळ पोलीस ठाण्यातील फौजदार अजय केसरकर, पोलीस कर्मचारी ढवळे, राठोड आणि सोलापूर न्यायालयातील मोहोळ पोलीस ठाण्यातील कोर्ट ऑर्डरली पवार यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयाची परवानगी न घेता अटक केली. पोलिसांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे त्या दिवशी आरोपींचा न्यायालयात जबाब घेता आला नाही. यात न्यायालयीन प्रक्रियेस अडथळा निर्माण झाला. या बेकायदेशीर कृत्याबद्दल संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी म्हणून न्यायालयात अर्ज दाखल झाला आहे. या प्रकरणात अर्जदार आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने व ॲड. वीरभद्र दासी काम पाहात आहेत.