सोलापूर : कर्करोगासारख्या दूर्धर, जीवघेण्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या तंबाखूजन्य गुटखा, मावा विक्रीवर कायदेशीर बंदी असूनही प्रत्यक्षात सर्वत्र गुटखा, माव्याची राजरोस विक्री होते. यातून सोलापुरात मावा खाऊ घालण्यावरून दोघा तरुणांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा हकनाक बळी गेल्याचा प्रकार घडला. शहरातील धाकटी ईरण्णा वस्ती भागात रात्री घडलेल्या एका घटनेत तिमण्णा सिद्राम बंडे (वय ३३, रा. मधुकर उपलब वस्ती, घरच्या वस्तीजवळ, सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत त्याची आई लक्ष्मीबाई सिद्राम बंडे (वय ६५) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याच घराजवळ राहणाऱ्या एका २५ वर्षांच्या तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मृत बंडे हा रात्री कामावरून घरी परतला आणि ताजेतवाने होऊन गल्लीत गेला. नंतर थोड्याच वेळात त्याच्या मित्राने त्यास तंबाखूजन्य असलेला मावा खाऊ घालण्याचा आग्रह धरला. परंतु तिमण्णा याने पैसे नसल्याने नकार दिला. तेव्हा चिडून मित्राने तिमण्णा याच्या कानशिलात जोरात चापट मारली आणि त्यास ढकलून दिले. यात तिमण्णा हा डोक्यावरून जमिनीवर पडला. त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर संबंधित हल्लेखोर तरुणाने पलायन केले असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.