सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांच्या गेले चार दिवस काम बंद आंदोलनानंतर सोमवारी कांदा लिलाव सुरू झाला. चार दिवस लिलाव खंड पडल्याने सुमारे ३२ कोटींची उलाढाल झाली नाही. दरम्यान या संपामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना आता दर कोसळल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.
सोमवारी पहाटे माथाडी कामगारांनी दाखल झालेला कांदा वाहनांतून उतरविला. सकाळी सहा ते नऊपर्यंत कांद्याचे वजन करण्यात आले आणि त्यानंतर लिलाव झाला. एकूण ४७२ मालमोटारींतून ४७ हजार २१६ क्विंटल कांदा दाखल झाला होता. लिलावाद्वारे कांद्याला प्रतिक्विंटल कमाल दर ४५३० रुपये तर सर्वसाधारण दर १८०० रुपये मिळाला. किमान दर प्रतिक्विंटल ३०० रुपये होता. यातून सुमारे आठ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. गेल्या १८ डिसेंबर रोजी कृषी बाजार समितीमध्ये सुमारे ४३ हजार क्विंटल कांदा दाखल झाला असता त्यास प्रतिक्विंटल कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये मिळाला होता. त्याही अगोदरच्या आठवड्यात कांद्याला कमाल दर सात हजार आणि सर्वसाधारण दर ३३०० रुपये मिळाला होता.
हेही वाचा…पुणे – बंगळुरू महामार्गाचा ठेकेदार बदलणार; शिवेंद्रसिंहराजे, नितीन गडकरींकडून अपूर्ण कामाची दखल
त्यानंतर कांद्याची आवक स्थिर असतानाही दरामध्ये घसरण होत गेल्याचे दिसून आले. आठवड्यात कांद्याचे दर सरासरी दोन हजार रुपयांनी खाली आले होते. यातच भर म्हणून माथाडी कामगारांनी सलग तीन दिवस काम बंद आंदोलन केल्यामुळे कांदा लिलाव होऊ शकला नाही. त्याशिवाय रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे सलग चार दिवस कांदा लिलाव न झाल्यामुळे सुमारे ३२ कोटींची आर्थिक उलाढाल थंडावली होती. त्याचा फटका शेतकरी आणि व्यापारी यांना बसला. यात पुन्हा गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची चिन्हे दिसू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणखी अस्वस्थ झाला आहे. तथापि, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी कांदा दरात घट न होता स्थिरता असल्याचा दावा केला आहे.