सोलापूर : पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी सतत तगादा लावून त्रास दिल्यामुळे वैतागून थकीत कर्जदाराने आत्महत्या केली. संगोला तालुक्यातील जवळा येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पतसंस्थेच्या दोघा अधिकाऱ्यांसह चौघाजणांविरुद्ध सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कमलेश दीपक राऊत (वय ३०, रा. जवळा) असे आत्महत्या केलेल्या थकीत कर्जदार तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ वैभव दीपक राऊत याने यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार फॅबटेक सहकारी पतसंस्थेच्या घेरडी शाखेतील अधिकारी अमोल सावंत (वय३५) व ऋत्विक पवार (वय ३८, रा. घेरडी, ता. सांगोला) तसेच आनंदा खरजे (वय ४५, रा. हंगिरगे, ता. सांगोला) आणि चंद्रकांत भगत (वय ३०, रा. वाढेगाव, ता. सांगोला) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत.
हेही वाचा – सांगली : गावच्या पाण्याची चोरी, गुन्हा दाखल
मृत कमलेश राऊन याने फॅबटेक पतसंस्थेतून व्यावसायिक अडचणींमुळे कर्ज घेतले होते. परंतु कर्जाचे हप्ते थकल्यामुळे मागील महिन्यापासून थकीत कर्जवसुलीसाठी पतसंस्थेकडून सतत तगादा लावण्यात आला होता. सतत छळ आणि धमक्यांमुळे वैतागलेल्या कमलेश याने जवळा गावात विलास गावडे यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.