संरक्षण दलातील अग्निपथ भरती योजनेविरोधात उद्रेकाचे लोण देशभरात पसरत असताना सोलापुरातही या योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या ९२ तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सेना दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगलेल्या या तरूणांनी अग्निपथ योजनेला तीव्र विरोध दर्शविला आहे.
दुपारी हे तरूण रेल्वे स्थानकावर एकत्र आल्याचे आणि त्यांच्याकडून अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलनाची तयारी होत असल्याची माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर बझार पोलिसांनी रेल्वे स्थानकावर धाव घेऊन संबंधित सर्व तरूणांना ताब्यात घेतले. हे तरूण सोलापूर जिल्ह्यातील असून बहुतांशी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, माळशिरस या तालुक्यातील असल्याचे सदर बझार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले.
प्रत्यक्षात एकमेकांना न ओळखणारे हे तरूण समाज माध्यमातून परस्परांच्या संपर्कात –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तरूण सेनादलात भरती होऊ इच्छितात. त्यांनी तशी तयारीही चालविली आहे. या तरूणांनी समाज माध्यमांच्या साह्याने स्वतःचा समूह तयार केला आहे. प्रत्यक्षात एकमेकांना न ओळखणारे हे तरूण समाज माध्यमातून परस्परांच्या संपर्कात आहेत. मोदी सरकारने संरक्षण दलातील अग्निपथ भरती योजना जाहीर केल्यानंतर त्यास देशात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणासह दक्षिणेत तेलंगणा राज्यातही या अग्निपथ भरती योजनेच्या विरोधात तरूणांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करीत आहेत. या तरूण आंदोलकांनी प्रामुख्याने रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत आहेत.
पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त तैनात केला आहे –
या पार्श्वभूमीवर देशातील सर्व महानगरांशी जोडले गेलेल्या सोलापूर रेल्वे स्थानकावर स्थानिक पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त तैनात केला आहे. याच दरम्यान, तरूणांचा जमाव रेल्वे स्थानकावर उतरल्याचे दिसून आले. हे तरूण अग्निपथ भरती योजनेच्या विरोधात आंदोलन छेडण्यासाठी आल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनी या सर्व तरूणांना ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाण्यात आणले.
दिवसभर हे तरूण पोलिसांच्याच ताब्यात होते –
पोलिसांनी या तरूणांशी संवाद करताना त्यांच्या मागण्या सनदशीर मार्गाने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मांडाव्यात, त्यासाठी तरूणांचे शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी भेट घालून देण्याची तयारी पोलिसांनी दर्शविली. दिवसभर हे तरूण पोलिसांच्याच ताब्यात होते.