सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत कार्यरत असलेल्या अशोक चौकातील पेट्रोल पंपावर दोन तर सहायक पोलीस आयुक्त (विभाग १) यांच्या कार्यालयात एक अशा तीन तृतीयपंथीयांना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नोकरीत रूजू करून घेतले आहे. या निमित्ताने बैजल यांनी तृतीयपंथीयांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी देत आपण त्यांच्याबरोबर आहोत, असा संदेश दिला आहे.
पोलीस आयुक्त बैजल हे गेल्या आॕक्टोबरमध्ये शहरात रूजू झाल्यापासून दैनंदिन कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यात आता समाजात सदैव तिरस्काराने नजरेने पाहिल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांना पोलीस आयुक्तालयाच्या पेट्रोल पंपावर नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी अनाथ, रस्त्यावर भीक मागणाऱ्या आणि देह विक्री करणाऱ्या महिलांच्या उपेक्षित मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बैजल यांनी प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून किमान कौशल्य प्रशिक्षण योजनेतून शिवणकाम प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमाचा लाभ ५० पेक्षा अधिक मुली घेत आहेत. दारू, ताडी, गुटखा अल्पवयीन मुलांनाही थेट विकला जात असल्याचे आढळून आल्यानंतर त्याबाबतही सतर्क राहून बैजल यांनी संबंधित विक्रेत्यांविरूध्द कारवाईची मोहीम हाती घेतली होती. असे विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना आता तृतीयपंथीयांनाही आधार देण्यासाठी पोलीस आयुक्त बैजल यांनी पाऊल उचलले आहे.
तृतीयपंथीयांकडे समाजात नेहमीच तिरस्काराच्या नजरेने पाहिले जाते. त्यांना रस्त्यावर भीक मागून उपेक्षित जीवन जगावे लागते. त्यांची सदैव हेटाळणी होते. बैजल यांनी याबाबत संवेदनशीलता दाखवत तृतीयपंथीयदेखील शेवटी माणूसच आहे. त्यांना सन्मानाने ताठ मानेने जीवन जगता यावे म्हणून पेट्रोल पंपावर नोकरी उपलब्ध करून दिली आहे. पेट्रोल पंपावर त्यांचे स्वागत करताना स्वतः बैजल यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली घाटे, डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर आदी उपस्थित होते. तिसऱ्या तृतीयपंथीयास सहायक पोलीस आयुक्त (विभाग १) यांच्या कार्यालयात काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
पेट्रोल पंपावर रूजू झालेले दोघेही तृतीयपंथीय सुशिक्षित आहेत. त्यापैकी एकाचे उच्च माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. दुसरा तृतीयपंथीय भाई छन्नुसिंग चंदेले समाजसेवा महाविद्यालयात एमएसडब्ल्यू (समाजसेवा) शिक्षण घेत आहे. त्याला पुढे स्पर्धा परीक्षाही द्यायची आहे. त्यादृष्टीने आता पोलीस पेट्रोल पंपावर नोकरी करताना आत्मविश्वास बळावेल, असा विश्वास दोघांनी व्यक्त केला आहे.