सगळीकडे नववर्षाच्या स्वागताचा उत्साह असताना सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तांच्या ‘गुलमोहर’ शासकीय बंगल्यात निसर्गशाळा भरलेली पाहायला मिळाली. हिरवाईने नटलेला निसर्गरम्य परिसर भल्या सकाळीच चिमुकल्या मुलांच्या किलबिलाने गजबला होता. कारण तेथे चक्क शाळाच भरली होती. ती होती निसर्ग शाळा. या निसर्गशाळेत विविध पक्षांचे जवळून निरीक्षण करता आले. हातात दाणे ठेवून पक्ष्यांना प्रत्यक्ष खाऊ घालता आले. या पक्षी निरीक्षणातून लहान मुले पक्षांच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सोलापुरात पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करीत असतानाच चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी अनोखा संकल्प हाती घेतला आहे. समाजात विशेषतः लहान मुलांमध्ये निसर्गप्रेम वाढविणे, त्यांच्यामध्ये चिमण्यांसह एकूणच पक्षीप्रेम वाढविणे आणि या माध्यमातून पोलीस व जनता यांच्यात सुसंवाद कायम राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच संकल्पनेतून बैजल यांनी हजारो शालेय मुलांना चिमणी घरट्यांचे वाटप सुरू केले.

एवढेच नव्हे तर आपल्या शासकीय बंगल्याच्या परिसरात सुंदर असे ‘पक्षीघर’ही उभारले आहे. हे पक्षीघर सकाळी शालेय मुलांच्या हस्ते खुले करण्यात आले. एरव्ही, एखाद्या उपक्रमाचा शुभारंभ फित कापून केला जातो. परंतु पक्षीघराचा शुभारंभ नायलॉन मांजा कापून आणि गलोली तोडून करण्यात आला. नायलॉन मांजा वापरून पतंग उडविताना अनेकवेळा पक्षांना इजा पोहोचते. गलोली तर पक्षांच्या शिकारीचे साधन समजले जाते. पक्षांसाठी घातक असलेल्या या दोन्ही वस्तू वापरायच्या नाहीत, याची जाणीव या निमित्ताने बालमनाला झाली.

नेचर कान्झर्व्हेशन सेंटरच्या माध्यमातून या पक्षीघराची निगा राखण्यात येणार आहे. पक्षीघर खुले होताच शालेय मुलांना जवळून पक्षांची प्रत्यक्ष हाताळणी करण्याची संधी मिळाली. मुलांनी खाली बसून दाणे भरलेले हात हळूच पुढे जमिनीवर सरकावले. नंतर थोड्याच वेळात पक्षी दाणे खाण्यासाठी आले आणि हातावर बसून दाणे खाऊ लागले. त्याचा विलक्षण आनंद मुलांना घेता आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पक्षीमित्र भारत छेडा यांनी पक्ष्यांची माहिती देताना त्यांची कशी हाताळणी करायची, याची शिकवण दिली.

हे पक्षीघर दररोज सकाळी ७ ते साडेनऊ आणि दुपारी ३ ते साडेचार या वेळात शालेय मुलांसाठी खुले राहणार आहे. त्यासाठी एक दिवस अगोदर शाळाप्रमुखांनी पोलीस आयुक्तांच्या स्वीय सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur police commissioner open his bungalow for school students to experience birds pbs